१६ वर्षांच्या मुस्कानला एअर पिस्तूलचे सुवर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 03:04 AM2018-03-29T03:04:14+5:302018-03-29T03:04:14+5:30
१६ वर्षांच्या मुस्कानने महिलांच्या २५ मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण जिंकताच
सिडनी : १६ वर्षांच्या मुस्कानने महिलांच्या २५ मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण जिंकताच भारताने बुधवारी आयएसएसएफ ज्युनियर नेमबाजी विश्वचषकात चीनला पदकतालिकेत मागे टाकले. मुस्कानने चीन आणि थायलंडच्या खेळाडूंना धक्का देत अव्वल स्थानावर झेप घेतली. मुस्कानच्या वर्चास्वापुढे चीनच्या किन सिहांग आणि थायलंडच्या कन्याकोर्न हिरुनफोएम यांना अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
सांघिक गटात मुस्कान, मनू भाखर आणि देवयांशी राणा यांनी सुवर्ण जिंकण्याचा मान मिळविला. भारताने या स्पर्धेत ९ सुवर्णांसह एकूण २२ पदकांची कमाई झाली. त्यात पाच रौप्य आणि आठ कांस्य पदकांचा समावेश आहे. चीनच्या खात्यात आठ सुवर्ण पदके आहेत. मुस्कानचे पदक भारताचे चौथे वैयक्तिक पदक होते. मागच्या वर्षी ती या स्पर्धेत चौथ्या स्थानावर होती. मुस्कानने सहाव्या फेरीत आघाडी घेत परफेक्ट पाच गुणांची नोंद केली. मनू या गटात चौथ्या आणि अरुणिमा सातव्या स्थानावर राहिली. (वृत्तसंस्था)