१७ वर्षीय ग्रँडमास्टर बारावीचा पेपर पाहून भलताच आनंदीत झाला; जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 01:42 PM2023-06-22T13:42:51+5:302023-06-22T13:43:25+5:30
तामिळनाडूतील १७ वर्षीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंदने प्रश्नपत्रिकेचा फोटो ट्विटरवर शेअर केरून आनंद व्यक्त केला
वयाच्या १०व्या वर्षी आंतरराष्ट्रीय मास्टर ठरलेला आणि सर्वात लहान म्हणजेच १२व्या वर्षी ग्रँडमास्टर किताब पटकावणारा बुद्धीबळपटू रमेशबाबू प्रज्ञानंदने बारावीची परीक्षा दिली आणि तो इंग्लिश प्रश्नपत्रिका पाहून खूपच आनंदी झाला. तामिळनाडूतील १७ वर्षीय प्रज्ञानंदने बुद्धिबळाशी संबंधित प्रश्न असलेल्या प्रश्नपत्रिकेचा फोटो ट्विटरवर शेअर केला. हा प्रश्न परदेशात शिकत असलेल्या मित्राला पत्र लिहिण्याचा होता, ज्यामध्ये चेन्नईतील ममल्लापुरम येथे ४४वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड कसे आयोजित करण्यात आले होते याचे वर्णन करणाचे होते.
बुद्धिबळपटू असल्याने, प्रज्ञानंदला या प्रश्नाचे उत्तर देताना आनंद झाला. त्याने लिहिले की,“आज मी १२ वी परिक्षेचा इंग्रजीचा पेपर दिला आणि हा प्रश्न आल्याचे पाहून आनंद झाला!”
Gave my 12th exams, English paper today.. and was happy to see this question appear!😁 pic.twitter.com/gdVxlvuCpQ
— Praggnanandhaa (@rpragchess) June 20, 2023
"तुमच्यासाठी हा एक चेकमेट क्षण होता!" असे एका युजर्सने त्याच्या ट्विटखाली लिहिले. “तुम्ही भारताचा गौरव आहात. तुम्ही अनेकांसाठी प्रेरणास्थान आहात,” असे दुसरे एका युजर्सने लिहिले.
१० ऑगस्ट २००५ रोजी चेन्नई येथे जन्मलेला प्रज्ञानंद हा महिला ग्रँडमास्टर आणि आंतरराष्ट्रीय मास्टर आर वैशाली हिचा धाकटा भाऊ आहे. त्याचे वडील TNSC बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून काम करतात, तर आई गृहिणी आहे. तो चेन्नईतील वेलमल मेन कॅम्पसमध्ये शिकतो.