नागपूरच्या १८ वर्षीय जयंत दुबळेचा पराक्रम, गोव्यातील तीन नद्या पार करणारा एकमेव जलतरणपटू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 05:31 PM2021-02-08T17:31:03+5:302021-02-08T17:31:22+5:30
नागपूर येथील जयंत जयप्रकाश दुबळे या १८ वर्षीय तरुणाने गोव्यातील तीन नद्या म्हणजे शापोरा, जुवारी आणि मांडवी नदी पार केली.
- सचिन कोरडे
नागपूर येथील जयंत जयप्रकाश दुबळे या १८ वर्षीय तरुणाने गोव्यातील तीन नद्या म्हणजे शापोरा, जुवारी आणि मांडवी नदी पार केली. अरबी समुद्रात या तिन्ही नद्यांचा संगम आहे. गोव्याच्या या समुद्रात ५१ किमीचे अंतर गाठत जयंतने ओपन वॉटर सी स्विमिंगमधील एक विक्रम नोंदवला. शापोरा ते आग्वाद असे २४ किमी आणि जुवारी ते मांडवी असे २७ किमीचे अंतर त्याने दोन टप्प्यांत गाठले. अशी कामगिरी करणारा तो एकमेव जलतरणपटू ठरला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्याच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. रोहित शर्मानं केलं पुन्हा निराश; गोलंदाजांच्या यशानंतर आता फलंदाजांची जबाबदारी
जेडी स्पोर्ट्स युथ फांउडेशन, नागपूरचा जयंत जयप्रकाश दुबळे हा अध्यक्ष आहे. फिट इंडिया चळवळीचा संदेश देण्यासाठी त्याने गोव्यात ही मोहीम राबविली होती. रविवारी (दि. ७) या मोहिमेचा शेवट झाला. त्याने जुवारी ते मांडवी पूल (अटल सेतूपर्यंत) २७ किमीचे अंतर ७ तास ९ मिनिटांत पूर्ण केले. या मार्गावर पोहत असताना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. समुद्रात लाटा उसळत होत्या. वाराही वाढला होता. मांडवीजवळ आल्यावर उभी असलेल्या जहाजांमुळे त्याला अडचणींचा सामना करावा लागला. असे असताही समतोल साधत त्याने मार्गक्रमण केले. जेली फिश मोठ्या संख्येने असल्याने त्याच्या मनात भीतीही दाटली होती. मात्र लक्ष्य केंद्रीत करत मोठ्या हिमतीने त्याने मोहीम फत्ते केली. सकाळी ८ वाजल्यापासून ते दुपारी ३.१० मिनिटांपर्यंत तो सलग पोहत होता. ११४ वर्षांत जे कुणालाच जमलं नाही ते आर अश्विननं केलं, विराटही लागला नाचू Video
दरम्यान, जयंतच्या या मोहिमेसाठी गोवा जलतरण संघटनेचे सचिव सुदेश नागवेकर, त्याचे प्रशिक्षक व वडील डाॅ. जयप्रकाश दुबळे, आई अर्चना दुबळे, मोहिमेचे संचालक सुबोध सुळे यांचे प्रोत्साहन मिळाले.
या धाडसाचे कौतुकच
समुद्रात पाेहणे खूप आव्हानात्मक असते. जयंत हा अशा ठिकाणाहून आला आहे जेथे समुद्र नाही. तलावात सराव करुन समुद्रत पोहण्याचे आव्हान त्याने लीलया पेलले आहे. त्याच्या धाडसाचे जितके काैतुक करावे तितके कमी आहे. गोव्यातील काही जलतरणपटूंनी २४ किमीचे अंतर पार केलेले आहे. मात्र ५१ किमीचा पल्ला कुणीही गाठू शकलेला नाही. त्यामुळे ही ऐतिहासिक कामगिरी आहे. १८ वर्षीय जयंतने खूप मोठे उदाहरण उभे केले आहे. त्याच्या या कामगिरीतून इतर जलतरणपटूंनी प्रेरणा घ्यायला हवी, असे मला वाटते. - आश्विन तोंबाट, अध्यक्ष गोवा ट्रायथलॉन संघटना.
कोरोनामुळे ९ महिने जलतरण तलाव बंद होते. गेल्या दोन महिन्यांतच मी तलावात सराव केला. त्याआधी केवळ फिटनेसवरच भर द्यावा लागला. तलावात सराव केल्यावर समुद्रात उतरलाे. ५१ किमीचे मोठे लक्ष्य होते. ते मी पार करू शकलो. त्याचा आनंद आहे. माझ्या यशाचे श्रेय प्रशिक्षक, वडील जयप्रकाश दुबळे आणि माझ्या चाहत्यांना देतो. - जयंत दुबळे