सॅल्यूट! १९ वर्षीय खेळाडूनं कोरोना लसीकरणासाठी खर्च केली करिअरची सर्व कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 01:51 PM2021-04-26T13:51:48+5:302021-04-26T13:54:53+5:30
Corona Virus Updates: भारतात सध्या कोरोना व्हायरसचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
Corona Virus Updates: भारतात सध्या कोरोना व्हायरसचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे देशातील जास्तीत जास्त नागरिकांचं कोरोना लसीकरण होणं महत्वाचं झालं आहे. देशातील नागरिक अशा संकटाच्या काळात एकमेकांची मदत करण्यासाठी देखील पुढे येताना दिसत आहेत. (19-year-old Indian golfer donates all his earnings to fund Vaccination Drive)
देशातील काही उद्योगपती आर्थिक मदतीसाठी पुढे आले आहेत. तर काहीजण सामाजिक पातळीवर सहकार्य करत आहेत. कोरोना काळात मदतीसाठी पुढे आलेल्या क्रीडा क्षेत्रातील एका युवा खेळाडूनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. १९ वर्षीय ग्लोल्फर कृषीव केएल टेकचंदानी (Krishiv KL Tekchandani) यानं देशातील नागरिकांच्या कोरोना लसीकरणासाठी पुढाकार घेतला आहे.
कोरोना संकट गंभीर, आयपीएल पुढे ढकला; पैसा ऑक्सिजन टँकसाठी वापरा, शोएब अख्तरनं दिला सल्ला
कृषीव यानं वयाच्या सातव्या वर्षापासूनच गोल्फ खेळायला सुरुवात केली होती. त्यानं आता आपल्या करिअरची आजवरची सर्व कमाई कोरोना लसीकरणासाठी खर्च करणार असल्याचं जाहीर केलं आहे. गेल्या वर्षी देखील कोरोना विरोधातील लढ्यासाठी भारताच्या अनेक खेळाडूंनी सढळहस्ते मदत केली होती. क्रिकेटपटूंपासून ते फूटबॉलपटूंपर्यंत अनेकांनी पंतप्रधान निधीला मदत देऊ केली होती. भारताचा युवा गोल्फर कृषीव यानं देशाच्या संकट काळात मदत करणं आपलं कर्तव्य असल्याचं म्हणत आपलं सारंकाही दान करण्याची तयारी असल्याचं मोठ्या मनानं जाहीर केलं आहे.
'माझे कुटुंब कोरोनाच्या संकटात, आयपीएल सोडतोय', आर.अश्विनची स्पर्धेतून माघार
कृषीवनं आजवर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. यात अनेक स्पर्धा जिंकल्या देखील आहेत आणि यात मिळालेली सर्व रक्कम कृषीव यानं कोरोना लसीकरणासाठी दान करण्याचं ठरवलं आहे. मुंबईतील चेंबूर येथील स्थानिक गोल्फ क्लबच्यावतीनं लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. कृषीव यानं आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्थानिक ग्लोफ क्लबच्या मोहीमेसाठी आर्थिक मदत म्हणून करिअरची आजवरची सर्व कमाई दान करत असल्याचं जाहीर केलं आहे.
सर जडेजाच्या तुफान बॅटिंगनं धोनीच्या पत्नीचे डोळे दिपले, म्हणाली...
गोल्फ कोर्समध्ये सध्या अनेक जण काम करत आहेत. त्यांच्याकडे अनेकदा खाण्यासाठी आणि औषधांसाठी पैसे नसतात. अशा लोकांचं कोरोना लसीकरण होणं अतिशय महत्वाचं आहे. विशेषत: लॉकडाऊन काळात अनेक कर्मचाऱ्यांना अनेक कठीण प्रसंगांना आणि अडचणींना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे अशा लोकांची मदत करणं आपलं कर्तव्य आहे, असं कृषीव म्हणाला.