युवी व केपी यांची २ कोटी मूळ किंमत
By admin | Published: January 25, 2016 02:27 AM2016-01-25T02:27:50+5:302016-01-25T02:27:50+5:30
इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) आतापर्यंतचा सर्वाधिक महागडा खेळाडू युवराज सिंग, इंग्लंडचा केविन पिटरसन, आॅस्टे्रलियाचे शेन वॉटसन आणि
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) आतापर्यंतचा सर्वाधिक महागडा खेळाडू युवराज सिंग, इंग्लंडचा केविन पिटरसन, आॅस्टे्रलियाचे शेन वॉटसन आणि मिशेल मार्श तसेच भारताचा ईशांत शर्मा यांच्यासह एकूण १२ क्रिकेटपटूंवर आगामी आयपीएलच्या ९व्या सत्रासाठी नव्याने बोली लागणार आहे. ६ फेब्रुवारीला बंगळुरु येथे होणाऱ्या लिलावात या सर्वांची किमान किंमत प्रत्येकी २ कोटी ठेवण्यात आली आहे.
या वेळी या १२ खेळाडूंसह एकूण ७१४ खेळाडूंवर बोली लावण्यात येईल. एका क्रीडा वृत्तसंस्थेनुसार आशिष नेहरा, दिनेश कार्तिक, स्टुअर्ट बिन्नी, संजू सॅम्सन, धवल कुलकर्णी, आॅस्टे्रलियाचा ४० वर्षीय खेळाडू मायकल हसी आणि वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन यांचीही किमान किंमत २ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.
आयपीएलच्या आठव्या सत्रात दिल्ली डेअरडेव्हिल्सने युवराज सिंगला सर्वाधिक १६ कोटी रुपयांमध्ये आपल्या चमूत घेतले. मात्र या सत्रात निराशाजनक कामगिरी केल्यामुळे त्याला संघाने बाहेरचा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे युवराज व नेहरा यांना आगामी आॅस्टे्रलियाविरुद्ध रंगणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. (वृत्तसंस्था)