राजगुरू महाविद्यालयात २00 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 12:12 AM2018-10-04T00:12:54+5:302018-10-04T00:13:38+5:30
हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात विज्ञान मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
राजगुरुनगर : हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात विज्ञान मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये रक्तगट, रक्तदाब, शरीरातील चरबीचे प्रमाण, रक्तातील साखरेचे प्रमाण, हिमोग्लोबिन, इलेक्ट्रो कार्डिओग्राम (ईसीजी) यासह विद्यार्थ्यांची उंची, वजनाची तपासणी करण्यात आली. या शिबिरात सुमारे २०० विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या तपासण्या करून घेतल्या. शिबिराचे उद्घाटन खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बाळासाहेब सांडभोर यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी संचालक कोंडीभाऊ टाकळकर, डॉ. सुधीर भालेराव, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. व्ही. डी. कुलकर्णी, डॉ. संजय शिंदे, प्रबंधक कैलास पाचारणे उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी बोलताना संचालक बाळासाहेब सांडभोर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी व्यायामाला जीवनाचा अविभाज्य घटक बनविला पाहिजे. व्यसनांपासून लांब राहताना शारीरिक, मानसिक तंदुरुस्ती राखण्यासाठी पौष्टिक आहार आणि उपयुक्त व्यायामाकडे लक्ष द्यायला हवे. व्यायामशाळा ही आधुनिक देवळे असून, व्यायामासारखे सुंदर औषध नाही असे ते म्हणाले.
डॉ. सुधीर भालेराव यांनी डेंग्यू, कावीळ, एड्स, हृदयविकार अशा विविध आजारांची माहिती सांगून त्यासाठी कराव्या लागणाऱ्या तपासण्यांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. या शिबिराच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी या आरोग्य तपासण्यांंची नेमकी माहिती व प्रमाण सांगणारे पोस्टर तयार केले. या सर्व तपासण्या पूजा पाटील, शारदा बुरूड, रेश्मा डवणे, स्नेहा पवळे, प्रतीक्षा पवळे, वैष्णवी खेडकर, प्रणव बारणे, ऋषिकेश खोलगडे, संकेत ढोरे या विद्यार्थ्यांनी केल्या. त्यांना डॉ. सुधीर भालेराव यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन विज्ञान मंडळ प्रमुख प्रा. विकास देशमुख, प्रा. रूपाली वायाळ व प्रयोगशाळा परिचर मुरलीधर सांडभोर, प्रयोगशाळा सहायक दिगंबर नांगरे यांनी केले.