२००८ - राजस्थान रॉयल्स ठरला विजेता
By Admin | Published: April 8, 2015 02:53 PM2015-04-08T14:53:21+5:302015-04-08T14:58:15+5:30
३९ वर्षीय शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली खेळणा-या राजस्थान रॉयल्सने पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले.
>फुटबॉलमधील प्रिमियर लीगच्या धर्तीवर भारतात ललित मोदींच्या सुपीक डोक्यातून आयपीएलची भन्नाट संकल्पना उदयास आली. इंडियन क्रिकेट लीगला टक्कर देण्यासाठी मोदींनी आयपीएलचा घाट घातला. बॉलीवूड व उद्योग क्षेत्रातील दिग्गजांचा शिरकाव, खेळाडूंवर लागणारी कोट्यावधींची बोली, टी - २० च्या सामन्याला ग्लॅमरची खमंग फोडणीच्या आधारे आयपीएलचे पहिले पर्व चांगलेच लोकप्रिय झाले. आंतररराष्ट्रीय खेळाडूंच्या समावेशामुळे आयपीएलकडे जगभराचे लक्ष वेधले गेले.
पहिल्या पर्वात आठ संघ सहभागी होती. प्रत्येक संघाला १४ सामने खेळायचे होते. १८ एप्रिल २००८ रोजी बंगळुरुतील स्टेडियमवर आयपीएलचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पार पडला. पहिल्याच सामन्यात ब्रँडन मॅक्यूलमने ७८ चेडूंमध्ये १५८ धावांची विस्फोटक खेळी करत आयपीएलचा दिमाखदार शुभारंभ केला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने २० षटकांत २२२ धावांचा डोंगर रचला. या सामन्यात बंगळुरुचा १४० धावांनी पराभव झाला. पहिल्याच सामन्यातील या थराराने आयपीएलची उत्कंठा वाढवली.
अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज हे संघ आमने सामने होते. चांगली सुरुवात करुनही चेन्नई सुपरकिंग्जला २० षटकांत अवघ्या १६२ धावाच करता आल्या. राजस्थान रॉयल्सची सुरुवात फारशी चांगली नव्हती. ७ व्या षटकांत ४२ धावांमध्ये त्यांनी तीन गडी गमावले होते. मात्र त्यानंतर युसूफ पठाण व शेन वॉटसन या जोडीने ६५ धावांची भागीदारी करत राजस्थान रॉयल्सला विजयाच्या दिशेने नेले. शेन वॉर्न व सोहेल तनवीर या जोडीने छोटी पण महत्त्वाची भागीदारी करत संघाला पहिल्या वहिल्या आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले. ३९ वर्षीय शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली खेळणा-या राजस्थान रॉयल्सने जेतेपद पटकावत सर्वांनाच धक्का दिला. युसूफ पठाण या राजस्थान रॉयल्सच्या विजयाचा शिल्पकार ठरला.