२००९ - अंडरडॉग डेक्कन चार्जर्सची चमकदार कामगिरी
By admin | Published: April 8, 2015 02:56 PM2015-04-08T14:56:24+5:302015-04-08T14:56:24+5:30
दक्षिण आफ्रिकेत रंगलेल्या आयपीएलच्या दुस-या पर्वात अंडरडॉग हैद्राबाद डेक्कन चार्जर्सने विजेतेपद पटकावले.
Next
>एप्रिल २००९ मध्ये भारतात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना आयपीएलच्या दुसरे पर्व रंगणार होते. निवडणुकीचा ताण असल्याने सुरक्षा यंत्रणांनी आयपीएलला सुरक्षा पुरवण्यात असमर्थता दर्शवली. त्यामुळे आयपीएलचे दुसरे पर्व संकटात सापडले होते. पण ललित मोदींनी 'मोदी'बाणा जपत आयपीएल सातासमुद्रापार म्हणजेच थेट दक्षिण आफ्रिकेत भरवण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डानेही बीसीसीआयला होकार कळवल्याने आयपीएलचे सीमोल्लंघन शक्य झाले.
१८ मार्च २००९ मध्ये केपटाऊन येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज सामन्याने दुस-या पर्वाची सुरुवात झाली. हा सामना मुंबई इंडियन्सने १९ धावांनी जिंकला. पहिल्या पर्वात गुणतालिकेत तळावर असलेल्या डेक्कन चार्जर्सने दुस-या पर्वात कमालच केली. अॅडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली खेळणा-या डेक्कन चार्जर्सने थेट अंतिम फेरीत धडक मारली. फायनलमध्ये डेक्कन चार्जर्सचा सामना होता तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी. रोमहर्षक सामन्यात डेक्कन चार्जर्सने बंगळुरुवर सहा धावांनी विजय मिळवला. डेक्कन चार्जसने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ६ गडी गमावून १४३ धावा केल्या. डेक्कन चार्जर्सच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत बंगळुरुचा डाव २० षटकांत १३७ धावांवर रोखला व संघाला विजेतेपद मिळवून दिले. विशेष म्हणजे दुस-या पर्वातही विजेतेपद पटकावणा-या संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियन खेळाडूनेच केले. गिलख्रिस्टची झंझावाती फलंदाजी हैद्राबाद डेक्कन चार्जर्ससाठी फलदायी ठरली.