2015 - मुंबईच सुपर किंग!

By admin | Published: April 9, 2016 02:53 PM2016-04-09T14:53:39+5:302016-04-09T14:54:35+5:30

संपूर्ण क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलेल्या 2015मधील आयपीएलच्या ८ व्या सत्रातील ‘ग्रँडफायनल’ मुकाबल्यात मुंबई इंडियन्सने बाजी मारली

2015 - Mumbai Super King! | 2015 - मुंबईच सुपर किंग!

2015 - मुंबईच सुपर किंग!

Next
>कोलकाता : संपूर्ण क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलेल्या 2015मधील आयपीएलच्या ८ व्या सत्रातील ‘ग्रँडफायनल’ मुकाबल्यात मुंबई इंडियन्सने बाजी मारली. त्यांनी चेन्नईवर ‘सुपर’ विजय मिळवत दुसऱ्यांदा ‘चॅम्पियन’ होण्याचा मान पटकाविला. मुंबई इंडियन्सचे हे दुसरे विजेतेपद आहे, तर चेन्नई सुपर किंग्ज चौथ्यांदा उपविजेता ठरला.
 
मुंबईच्या २०३ या तगड्या लक्ष्याचा पाठलाग करताना धोनीचा संघ ८ बाद १६१ धावापर्यंत मजल मारू शकला. त्यांच्या ड्वेन स्मिथची (५७) खेळी व्यर्थ ठरली. रोहित शर्मा (५०), लेंडल सिमॉन्स (६८) यांच्या अर्धशतकांनंतर मुंबईच्या मॅक्क्लेनघन, मलिंगा आणि हरभजनसिंग यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्यामुळे मुंबईने ४१ धावांनी विजय साजरा केला. उल्लेखनीय म्हणजे, यंदाच्या सत्रात मुंबईला पराभवाच्या चौकारास सामोरे जावे लागले होते. त्यानंतर सातत्यपूर्ण कामगिरी करीत मुंबईने चषकावर नाव कोरले.
 
प्रत्युत्तरात, चेन्नईची सुरुवात चांगली झाली नाही. माईक हसीला मॅक्क्लेनघनने अवघ्या ४ धावांवर बाद केले. त्यानंतर ड्वेन स्मिथ (५७) आणि सुरेश रैना यांनी दुसऱ्या गड्यासाठी ६६ धावांची भागीदारी केली. आक्रमक फटकेबाजी करणाऱ्या स्मिथला हरभजनसिंगने पायचित केले. तो बाद झाल्यानंतर चेन्नईची धावगती मंदावली. हरभजनने मोक्याच्या क्षणी रैनालाही (२८) बाद केले.त्यानंतर ब्राव्हो (९), नेगी (३), ड्यु प्लेसिस (१) हे फलंदाज मुंबईच्या गोलंदाजांपुढे अपयशी ठरले. महेंद्रसिंग धोनीने संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोसुद्धा १३ चेंडूंत १८ धावा काढून बाद झाला. मलिंगाच्या ‘यॉर्करवर’ त्याचा त्रिफळा उडाला. तळात मोहित शर्माने ७ चेंडूंत नाबाद २१ धावा फटकावल्या. मात्र, तोपर्यंत मुंबईने विजय हिसकावून घेतला होता.
 
त्याआधी, ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर भरगच्च प्रेक्षकांच्या उपस्थितीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुंबई इंडियन्स संघ दुसऱ्या विजेतेपदाच्या इराद्याने मैदानात उतरला होता. नाणेफेकीचा कौल चेन्नईच्या धोनीने जिंकला असला तरी रोहित शर्मा आणि लेंडल सिमॉन्स या जोडीने तो फोल ठरवला. पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर पार्थिव पटेल (०) धावबाद झाला होता. ड्यु प्लेसिसने हवेत झेप घेत हा उत्कृष्ट ‘थ्रो’ केला. पार्थिवच्या रूपात मुंबईला पहिला झटका बसला. तेव्हा चेन्नईच्या खेळाडूंनी प्रचंड जल्लोष केला. मात्र, त्यांचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. नेहराच्या पहिल्या षटकात केवळ एकच धाव मिळाल्यानंतर दुसऱ्या षटकांत मात्र रोहितने १६ धावा चोपल्या. त्याने मोहित शर्माला सलग षट्कार आणि चौकार ठोकत इरादा स्पष्ट केला.
 
रोहित-सिमॉन्स जोडीने अवघ्या ५.१ षटकांत संघाचे अर्धशतक गाठले. त्यांनी अवघ्या २७ चेंडूंत दुसऱ्या गड्यासाठी ही अर्धशतकी भागीदारी केली. सिमॉन्सने ३५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. यात त्याच्या ५ चौकार आणि ३ षट्कारांचा समावेश होता. त्यानंतर या जोडीच्या धुवांधार फटकेबाजीमुळे मुंबईने ६२ चेंडूंत शतक गाठले. रोहित आणि सिमॉन्स जोडीने अवघ्या ५७ चेंडूंत १०० धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने अवघ्या २५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. यामध्ये त्याच्या ६ चौकार आणि दोन षट्कारांचा समावेश आहे. अर्धशतक पूर्ण होताच रोहित उत्तुंग फटका मारण्याच्या नादात ब्राव्होच्या चेंडूंवर जडेजाकरवी झेलबाद झाला. तेव्हा मुंबईने १२ षटकांत २ बाद १२० धावा केल्या होत्या.
 
रोहित परतताच सिमॉन्सही बाद झाला. त्यानंतर केरॉन पोलार्ड आणि अंबाती रायडू या जोडीने चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई केली. पोलार्डने १८ चेंडूंत ३६ (२ चौकार, ३ षट्कार) धावा चोपल्या. रायडूने २४ चेंडूंत ३६ धावांची नाबाद खेळी केली. हरभजन सिंगने अखेर मुंबईच्या दोनशे धावसंख्येवर शिक्कामोर्तब केले. त्याने ३ चेंडूंत नाबाद ६ धावा केल्या. चेन्नईकडून ड्वेन ब्राव्होने २, तर ड्वेन स्मिथ आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

Web Title: 2015 - Mumbai Super King!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.