२०२० आॅलिम्पिक बोलीतील भ्रष्टाचाराची चौकशी सुरू
By admin | Published: May 26, 2016 03:49 AM2016-05-26T03:49:03+5:302016-05-26T03:49:03+5:30
जपानची राजधानी टोकियो येथे २०२०चे आॅलिम्पिक होणार आहे. जपानकडे हे आयोजन सोपविताना झालेल्या लिलावातील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी बुधवारी समिती
टोकियो : जपानची राजधानी टोकियो येथे २०२०चे आॅलिम्पिक होणार आहे. जपानकडे हे आयोजन सोपविताना झालेल्या लिलावातील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी बुधवारी समिती स्थापन करण्यात आली.
२०२० आॅलिम्पिकच्या आयोजनासाठी टोकियो शहराने बोली लावली होती. त्यात यशही आले; पण या यशस्वी बोलीसाठी अवैधरीत्या निधी देण्यात आल्याचा आरोप झाला आहे. या प्रकरणाचा तपास आजपासून सुरू झाला. मीडियात आलेल्या वृत्तानुसार बोली लावणाऱ्या शहराने जवळपास २० लाख डॉलर सिंगापूरच्या बँकेत जमा केले. हे प्रकरण माजी आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स प्रमुख लेमाईन डियॉक याचा मुलगा पापा मसाता डियॉक याच्याशी संबंधित मानले जात आहे. जपान आॅलिम्पिक समितीने यंदाच चौकशी पथक नेमले होते. त्यात दोन वकील आणि एका शासकीय आॅडिटरचा समावेश आहे. समितीची पहिली बैठक उद्या (गुरुवारी) होईल.
टोकियोच्या बोली पथकाचे प्रमुख सुनेकाजू लाकेदा यांनी या आरोपाचा इन्कार केला आहे. हा निधी कुठल्या तरी कंपनीला कामापोटी देण्यात आल्याचे ते म्हणाले. टोकियोने २०२० आॅलिम्पिकचे यजमानपद इस्तंबूल आणि माद्रिदला मागे टाकून जिंकले होते. (वृत्तसंस्था)