२०२४चे आॅलिम्पिक भारतात शक्य!
By Admin | Published: April 7, 2015 04:02 AM2015-04-07T04:02:38+5:302015-04-07T04:02:38+5:30
जगातील सर्वांत मोठा क्रीडा कुंभमेळा असलेले आॅलिम्पिक आपल्या देशात होण्याचे सव्वाशे कोटी भारतीयांचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे
पुणे : जगातील सर्वांत मोठा क्रीडा कुंभमेळा असलेले आॅलिम्पिक आपल्या देशात होण्याचे सव्वाशे कोटी भारतीयांचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. २०२४चे आॅलिम्पिक भारतात होऊ शकते. आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बॅश या महिन्याच्या २७ तारखेला भारतात येणार आहेत. यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत. त्यावेळी भारतात २०२४च्या आॅलिम्पिक आयोजनासंदर्भात महत्वाची चर्चा अपेक्षित असल्याचे सुत्रांनी सांगितले.
बॅश यांच्या भारत दौऱ्यासंदर्भात भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष रामचंद्रन यांनी कार्यकारी समितीच्या सर्व सदस्यांना पत्र पाठवले आहे. रामचंद्रन आणि भारताचे क्रीडा सचिव यांनी लुसान येथे बॅश यांनी भेट घेऊन त्यांनी भेट निश्चित केली. या दौऱ्यात ते भारतातील खेळांचा विकास आणि इतर बाबींवर चर्चा करणार आहेत. लुसाने भेटीत बॅश यांना आॅलिम्पिकमधील क्रीडा प्रकारांसाठी निधी देण्याबाबतही विनंती करण्यात आली. आयओएचे महाराष्ट्रातील एकमेव सदस्य नामदेव शिरगावकर यांनी अध्यक्षांकडून असे पत्र पाठवण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. २०१६चे आॅलिम्पिक रिओमध्ये, तर २०२०ची स्पर्धा टोकियोत होणार आहे. २०२४च्या स्पर्धेसाठी रोम, हॅम्बर्ग, बोस्टन या शहरांनी आधीच रस दाखवलेला आहे. भारतासह नैरोबी, दोहा, पॅरिस आणि सेंट पीर्ट्सबर्ग ही शहरेदेखील या शर्यतीत सामील होण्याची शक्यता आहे. आॅलिम्पिक बीडसाठी अधिकृतरित्या ५४० कोटी रुपये खर्च येतो. मात्र. लॉबिंग आणि ‘इतर’ गोष्टींचा विचार करता हा खर्च १००० ते १२०० कोटीच्या घरात जातो. भारताची आर्थिक प्रगती पाहता हा देश येत्या काळात आॅलिम्पिकचे यशस्वीपणे आयोजन करू शकतो, असा विश्वास क्रीडाविश्वातील अनेक तज्ज्ञांना वाटते.
भारताने आॅलिम्पिसाठी बिडिंग करण्याचे निश्चित झाल्यावर सहाजिकच राजधानी दिल्लीला यजमानपदाचे शहर म्हणून प्राधान्य असेल. मात्र, तेथे रोर्इंग आणि यॉटिंग यांसारख्या खेळांसाठी आवश्यक मोठा तलाव वा समुद्र परिसरात नाही. हे पाहता दिल्लीनंतर पुण्याला अशी संधी लाभू शकते. किंवा पुण्यासह मुंबईला संयुक्त यजमानपदाचे दावेदार ठरवले जाऊ शकते. या ठिकाणी इतर खेळांबरोबरच रोर्इंग आणि यॉटिंगसाठी मोठे तलाव वा समुद्र दिल्लीच्या तुलनेत कमी अंतरावर उपलब्ध आहे. (प्रतिनिधी)