खेलरत्न विजेत्यास २५, अर्जुनसाठी १५ लाख!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 02:54 AM2020-08-21T02:54:41+5:302020-08-21T07:09:41+5:30
‘खेलरत्न’ विजेत्यास सध्याच्या साडेसात लाखाऐवजी २५ लाख व अर्जुन पुरस्कार विजेत्याना पाच लाखऐवजी १५ लाख रुपये रोख दिले जातील.
नवी दिल्ली : क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारापोटी देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याची योजना आखली आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास ‘खेलरत्न’ विजेत्यास सध्याच्या साडेसात लाखाऐवजी २५ लाख व अर्जुन पुरस्कार विजेत्याना पाच लाखऐवजी १५ लाख रुपये रोख दिले जातील.
मंत्रालय या प्रस्तावास अंतिम रुप देण्याच्या स्थितीत असून क्रीडामंत्री किरेन रिजिजू हे २९ आॅगस्ट रोजी राष्टÑीय क्रीडा दिनी घोषणा करू शकतात. क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार,राष्टÑीय क्रीडा पुरस्काराच्या रकमेत वाढ निश्चित असून त्या आशयाचा प्रस्ताव तयार करण्यात आला.पुरस्कार रक्कम कमी असल्याची अनेक खेळाडूंची ओरड होती. क्रीडामंत्र्यांनी स्वत: पुढाकार घेत प्रस्ताव तयार केला आहे. सरकारने प्रस्ताव मान्य केल्यास यंदापासूनच पुरस्कार रकमेत भरघोस वाढ होईल.’ (वृत्तसंस्था)
>क्रिकेटपटू रोहित शर्मा, महिला मल्ल विनेश फोगाट, महिला हॉकी कर्णधार राणी रामपाल, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा आणि रिओ पॅरालिम्पिकचा सुवर्णपदक विजेता उंचउडीपटू मरियप्पन थंगवेलू या पाच नावाची ‘खेलरत्न’साठी तर अन्य २९ जणांच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. याशिवाय द्रोणाचार्यसाठी १३ आणि ध्यानचंद पुरस्कारासाठी १५ प्रशिक्षकांची नावे आहेत. क्रीडा मंत्रालयाच्या मंजुरीनंतर अंतिम यादी जाहीर होईल.