तामिळनाडूच्या ६ बाद २६१ धावा
By admin | Published: January 2, 2017 12:37 AM2017-01-02T00:37:33+5:302017-01-02T00:37:33+5:30
निराशाजनक सुरुवातीनंतर बाबा इंद्रजित व कौशिक गांधी यांनी झळकावलेल्या वैयक्तिक अर्धशतकांमुळे सावरलेल्या तामिळनाडूने अखेरच्या सत्रात तीन विकेट गमावल्यामुळे रणजी
राजकोट : निराशाजनक सुरुवातीनंतर बाबा इंद्रजित व कौशिक गांधी यांनी झळकावलेल्या वैयक्तिक अर्धशतकांमुळे सावरलेल्या तामिळनाडूने अखेरच्या सत्रात तीन विकेट गमावल्यामुळे रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईविरुद्ध उपांत्य फेरीच्या लढतीत रविवारी पहिल्या दिवसअखेर त्यांची ६ बाद २६१ अशी स्थिती झाली.
तामिळनाडूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला, पण त्यांची सुरुवात निराशाजनक झाली. धावफलकावर ६५ धावांची नोंद असताना त्यांची सलामीची जोडी तंबूत परतली होती. त्यानंतर इंद्रजित (६४) व गांधी (५०) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी करीत डाव सावरला. ही भागीदारी संपुष्टात आल्यानंतर तामिळनाडूची पुन्हा घसरगुंडी उडाली. तामिळनाडूला आता मोठी धावसंख्या उभारून देण्याची जबाबदारी अनुभवी विजय शंकरवर आहे. तो ४१ धावा काढून खेळपट्टीवर आहे. त्याला दुसऱ्या टोकाकडून अश्विन क्राईस्ट (९) साथ देत आहे. मुंबईतर्फे अभिषेक नायर व शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर बलविंदर सिंग संधू व विजय गोहिल यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी परतवले.
त्याआधी, पहिला प्रथम श्रेणी सामना खेळणारा गंगा श्रीधर राजू (१६) आणि कर्णधार अभिनव मुकुंद (३८) यांनी सलामीला ४५ धावांची भागीदारी केली. राजूला नायरने माघारी परतवले, तर संधूने मुकुंदला तंबूचा मार्ग दाखवला. त्यानंतर इंद्रजित व गांधी यांनी डाव सावरला. इंद्रजितने ९० चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. ही भागीदारी चहापानापूर्वी शार्दुलने तोडली. त्याने इंद्रजितला बाद केले. इंद्रजितने ११४ चेंडूंना सामोरे जाताना ९ चौकार लगावले.
गांधीने तिसऱ्या सत्रामध्ये १३६ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले, त्याच षटकात नायरच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्याच्या अर्धशतकी खेळीत ८ चौकारांचा समावेश आहे.
शार्दुलने दिनेश कार्तिकला (१६) मोठी खेळी करण्याची संधी दिली नाही. बाबा अपराजितला (९) लौकिकाला साजेशी खेळी करता आली नाही. त्यानंतर विजय शंकरने अश्विन क्राईस्टच्या साथीने दिवसअखेर गडी बाद होणार नाही, याची खबरदारी घेतली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ३० धावांची अभेद्य भागीदारी केली. विजय शंकरने ६२ चेंडूंना सामोरे जाताना ८ चौकार लगावले.
त्याआधी, मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ याला प्रथम श्रेणी पदार्पणाची संधी मिळाली. (वृत्तसंस्था)