ऑलिम्पिक गाजवणाऱ्या युगांडाच्या खेळाडूची हत्या; छातीवर आणि मानेवर चाकूने वार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 04:16 PM2024-01-02T16:16:28+5:302024-01-02T16:16:57+5:30
युगांडातून क्रीडा विश्वाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे.
एल्डोरेट (केनिया): युगांडातून क्रीडा विश्वाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. तीन वेळचा युगांडाचा ऑलिंम्पियन बेंजामिन किपलागट केनियातील एल्डोरेटमध्ये मृतावस्थेत आढळला अन् एकच खळबळ माजली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टार खेळाडूची हत्या करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. बेंजामिनचा मृतदेह रविवारी सकाळी त्याच्या भावाच्या कारमध्ये सापडला. तसेच मृतदेहावर चाकूचे वार आणि काही जखमा आढळून आल्या.
ऑलिम्पिकमध्ये युगांडाचे प्रतिनिधित्व
माहितीनुसार, केनियाची राजधानी नैरोबीपासून सुमारे ३१२ किलोमीटर दूर असलेल्या एल्डोरेट शहराजवळ हत्येपूर्वी किपलागट कार चालवत होता. पण, स्टार खेळाडूची हत्याच झाली असल्याचा दावा स्थानिक पोलिसांनी केला. मात्र हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. लांब पल्ल्याचा धावपटू म्हणून किपलागटची ओळख होती. त्याने ३ हजार मीटर स्टीपलचेसमध्ये विशेष प्राविण्य मिळवले. तसेच त्याने सहा जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि २००८, २०१२ आणि २०१६ उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये युगांडाचे प्रतिनिधित्व केले. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने उपांत्य फेरी गाठली होती.
दरम्यान, किपलागटच्या मृतदेहावर वार आढळून आले. त्याच्या छातीवर आणि मानेवर चाकूने वार केलेल्या जखमा होत्या. खरं तर ऑलिम्पिकमध्ये युगांडाचे प्रतिनिधित्व करताना त्याने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये ८.०३.८१ सह अंतर गाठण्याची किमया साधली.