राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील घोटाळ्यात ३३ गुन्हे दाखल
By Admin | Published: December 11, 2015 12:02 AM2015-12-11T00:02:57+5:302015-12-11T00:02:57+5:30
भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळे, तसेच खरेदी व कामातील कमिशनमुळे जगभरात चर्चेचा विषय ठरलेल्या २०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसंदर्भात केंद्रीय
नवी दिल्ली : भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळे, तसेच खरेदी व कामातील कमिशनमुळे जगभरात चर्चेचा विषय ठरलेल्या २०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसंदर्भात केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) पथकाने आतापर्यंत ३३ गुन्ह्यांची नोंद केली आहे.
केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनातील उपकरणे खरेदी, बांधकाम, कर्मचारी भरती, सल्लागार-सेवा, सुविधांचा दुरुपयोग, तिकिटांची विक्री, आयोजनातील संपत्ती आदींतील गैरव्यवहाराबाबत एकूण ३३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील १९ नियमित प्रकरणे असून, १४ प्रकरणांचा प्रारंभिक तपास सुरू असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.
सीबीआयला मिळालेल्या माहितीनुसार १४ आरोपी, तसेच ११ फर्मविरुद्ध आठ नियमित प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. विविध देशांकडून माहिती मिळविण्यात अडचणी येथे असल्याने घोटाळ्याचा तपास करण्यात सीबीआयला अडचणी येत असल्याकडे मंत्र्यांनी लक्ष वेधले. याशिवाय विदेशात स्थायिक असलेल्या आरोपींची विचारपूस करण्यातही सीबीआयला अडचण येत असून, दिल्ली विशेष पोलीस सेलकडून परवानगी घेण्यात अनेक अडचणी येतात, त्यामुळे तपासाची गती मंदावली आहे. नवी दिल्ली येथे २०१० मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी अनेक आरोपींसह आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनादेखील तिहार कारागृहाची हवा खावी लागली होती. (वृत्तसंस्था)