३३व्या वर्षीही फेडएक्स्प्रेस सुसाट

By admin | Published: November 24, 2014 02:50 AM2014-11-24T02:50:34+5:302014-11-24T02:50:34+5:30

३३ वर्षांची फेडएक्स्प्रेस आजही सुसाट असल्याची प्रचिती रविवारी अनुभवायला मिळाली. रॉजर फेडररच्या झंझावाती खेळासमोर फ्रान्सच्या रिचर्ड गॅस्कुएटला तग धरण्यात अपयश आले.

At the 33rd year, FedExpress Suicide | ३३व्या वर्षीही फेडएक्स्प्रेस सुसाट

३३व्या वर्षीही फेडएक्स्प्रेस सुसाट

Next

फ्रान्स : ३३ वर्षांची फेडएक्स्प्रेस आजही सुसाट असल्याची प्रचिती रविवारी अनुभवायला मिळाली. रॉजर फेडररच्या झंझावाती खेळासमोर फ्रान्सच्या रिचर्ड गॅस्कुएटला तग धरण्यात अपयश आले. फेडीने ही लढत ६-४, ६-२, ६-२ अशी जिंकून स्वित्झर्लंडला पहिल्यावहिल्या डेव्हिस चषक जेतेपदाचा मान मिळवून दिला. स्वित्झर्लंडने ही स्पर्धा ३-१ अशी जिंकली. १९९२ नंतर स्वित्झर्लंडने पहिल्यांदा डेव्हिस चषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता आणि हा जेतेपदाचा दुष्काळ संपविण्यात आज त्यांना यश मिळाले.
१७ वेळा ग्रॅण्ड स्लॅम पटकावणाऱ्या फेडररला गत आठवड्यात पाठीच्या दुखापतीने त्रस्त केले होते. शुक्रवारी या दुखापतीतून सावरत कोर्टवर उतरलेल्या फेडररला फ्रान्सच्या गाएल मोनफिल्सकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे परतीच्या सामन्यात फेडररने दमदार कमबॅक केले. २७ हजार ४४८ प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या लढतीत फेडररने अप्रतिम खेळ करून सर्वांची मने जिंकली. या जेतेपदासाठी आम्ही कडवी झुंज दिली. गेली १५ वर्षे मी या स्पर्धेत खेळत आहे आणि जेतेपदाच्या इतक्या जवळ या पूर्वी कधी आलो नव्हतो, असे मत फेडररने सामना झाल्यानंतर व्यक्त केले. तो म्हणाला, या विजयाचा आनंद शब्दात सांगणे कठीण आहे.
अंतिम लढतीच्या पहिल्या सामन्यात स्वित्झर्लंडच्या स्टान वावरिंकाने ६-१, ३-६, ६-३, ६-२ अशा फरकाने जो विलफ्रिड त्सोंगाचा पराभव करून सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. मात्र दुसऱ्याच सामन्यात फ्रान्सच्या गाएल मोनफिल्सने ६-१, ६-४, ६-३ असे दुखापतग्रस्त फेडररला पराभूत केले आणि लढत १-१ अशी बरोबरीत आणली. एकेरीतील पराभवाचा वचपा फेडररने वावरिंकासह दुहेरी लढतीत काढला. या जोडीने ज्युनियन बेनेतू आणि रिचर्ड गेसक्वेट यांचा सलग सेटमध्ये पराभव करून आघाडी २-१ अशी मजबूत केली. फेडररने परतीच्या लढतीत बाजी मारून स्वित्झर्लंडला पहिल्या डेव्हिस चषकाचे जेतेपद पटकावून दिले. (वृत्तसंस्था)

Web Title: At the 33rd year, FedExpress Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.