३६ वर्षांनंतर महिला हॉकीचे सुवर्ण जिंकण्याची संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 07:27 AM2018-08-31T07:27:37+5:302018-08-31T07:28:01+5:30
जपानविरुद्ध भारताचा अंतिम सामना आज
जकार्ता : २० वर्षानंतर अंतिम फेरी गाठल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेत अंतिम सामन्यात शुक्रवारी जपानविरुद्ध लढत द्यायची आहे. ३६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुवर्णपदकाचा दुष्काळ संपविण्याची हीच संधी असेल. त्याचवेळी पुरुष संघाच्या अनपेक्षित पराभवाचे दडपण येऊ न देता सकारात्मक खेळ करण्याचे आव्हानही भारतीय महिलांपुढे असेल.
मागच्या स्पर्धेतील कांस्यविजेत्या भारताने बुधवारी उपांत्य सामन्यात चीनवर १-० ने विजय नोंदवून २० वर्षानंतर आशियाडच्या अंतिम फेरीत धडक दिली. याआधी १९९८ च्या बँकॉक आशियाडमध्ये अंतिम सामना खेळणारा भारतीय संघ कोरियाकडून पराभूत झाला होता. भारताने एकमेव सुवर्ण जिंकले ते १९८२ च्या दिल्ली आशियाडमध्ये. एकूण नऊ वेळेपैकी भारताच्या खात्यात आतापर्यंत एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य अशी पाच पदकांची नोंद झाली.
विश्व क्रमवारी तसेच या स्पर्धेतील आतापर्यंतची कामगिरी पाहता नवव्या स्थानावरील भारत १४ व्या स्थानावरील जपानविरुद्ध विजयाचा प्रबळ दावेदार मानला जातो. पुरुष संघाप्रमाणे भारतीय महिला संघानेही सर्वांना चकित केले. संघाला एकही पराभव पत्करावा लागला नाही. इंडोनेशियावर ८-०, कझाखस्तानवर २१-०, कोरिया ४-१ आणि थायलंडवर ५-० अशा विजयाची नोंद केली. भारतीय संघाचा बचाव देखील शानदार ठरला.
भारतीय संघाची कर्णधार राणी रामपाल हिने येथे सुवर्ण जिंकून 2020 च्या आॅलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळविण्याचा निर्धार व्यक्त केला. आक्रमक फळीत अनुभवी वंदना कटारिया आणि स्वत: राणीचा समावेश असून दोघींनी पाच सामन्यात येथे ३९ गोल केले.