२०२६ च्या फुटबॉल विश्वचषकात ४८ संघ
By admin | Published: January 11, 2017 01:34 AM2017-01-11T01:34:32+5:302017-01-11T01:34:32+5:30
२०२६ च्या फुटबॉल विश्वचषकात सध्याच्या ३२ संघांच्या तुलनेत ४८ देशांचे संघ सहभागी होतील अशी घोषणा विश्व फुटबॉलचे संचालन करणाऱ्या फिफाने केली आहे
झुरिच : २०२६ च्या फुटबॉल विश्वचषकात सध्याच्या ३२ संघांच्या तुलनेत ४८ देशांचे संघ सहभागी होतील अशी घोषणा विश्व फुटबॉलचे संचालन करणाऱ्या फिफाने केली आहे. अध्या अस्तित्वात असलेल्या फॉर्मेटमध्ये आणखी १६ संघांची भर पडणार आहे.
फिफा अध्यक्ष जियानी इन्फेनटिनो हे प्रत्येकी तीन संघांचे १६ ग्रुप करण्याच्या बाजूने आहेत. प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ पुढील फेरी गाठू शकतील. पुढील फेरीत ३२ संघ कायम राहतील. इन्फेनटिनो यांनी निवडणुकीदरम्यान सहभागी संघांची संख्या वाढविण्याचे आश्वासन दिले होते. यामुळे फिफाच्या २११ सदस्य देशांसाठी आर्थिक मदत मिळविणे सोईचे होईल.
सध्या विश्वचषकात ६४ सामने खेळविले जातात. ४८ संघांचा समावेश केल्यास ८० सामने खेळविले जाणार आहेत. प्रसारण, आयोजन आणि तिकीट विक्री यातून २०१८च्या विश्वचषकाच्या तुलनेत एक अब्ज डॉलरची अवांतर कमाई होणार आहे.
रशियात २०१८ च्या विश्वचषकाच्या अयोजनातून ५.५ अब्ज डॉलर कमाई होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
फिफाच्या सहा उपखंडांना किती स्थाने मिळतील याचा निश्चित अंदाज मे पर्यंत येऊ शकेल, शिवाय युएफा स्पर्धेत युरोपमधील १६ संघ सहभागी होतील. स्पर्धेचे आयोजन उत्तर अमेरिकेत केले जाणार आहे.
(वृत्तसंस्था)
मॅरेडोनाचा पाठिंबा
विश्वचषकात ४८ संघांच्या सहभागास दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना याने पाठिंबा दर्शविला. काल झुरिच येथील फिफा मुख्यालयात बोलताना मॅरेडोना म्हणाला, ‘हा विचार सर्वसमावेशक आहे. स्पर्धेत या स्तरावर जे पोहोचू शकले नाहीत अशा देशांसाठी हे पाऊल संधी देणारे आहे.’