‘५००’ नंबरी विजयाची भेट
By Admin | Published: September 27, 2016 05:10 AM2016-09-27T05:10:55+5:302016-09-27T05:10:55+5:30
रविचंद्रन आश्विनच्या फिरकीने पुन्हा एकदा कमाल केली. आश्विनच्या (६ बळी) भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटी सामन्यात सोमवारी पाचव्या व अखेरच्या
कानपूर : रविचंद्रन आश्विनच्या फिरकीने पुन्हा एकदा कमाल केली. आश्विनच्या (६ बळी) भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटी सामन्यात सोमवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी न्यूझीलंडचा १९७ धावांनी पराभव करीत आपल्या ऐतिहासिक ५०० व्या कसोटी सामन्याला संस्मरणीय केले.
४३४ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा दुसरा डाव पाचव्या व अखेरच्या दिवशी सोमवारी उपाहारानंतर काही वेळांतच २३६ धावांत संपुष्टात आला. भारताने या निकालासह तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेत आयसीसी क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावण्याच्या दिशेने वाटचाल केली. आश्विनने अनुकूल स्थितीचा लाभ घेताना १३२ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले. त्याने या लढतीत एकूण १० बळी घेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मोहम्मद शमीने आज (२-१८) दोन बळी घेत आश्विनला योग्य साथ दिली. रवींद्र जडेजाने एक बळी घेतला. अष्टपैलू कामगिरी करणारा जडेजा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
धावफलक
भारत पहिला डाव : ३१८. न्यूझीलंड : पहिला डाव : २६२. भारत : दुसरा डाव : ५ बाद ३७७ (डाव घोषित). न्यूझीलंड : दुसरा डाव : लॅथम पायचित गो. आश्विन ०२, गुप्टिल झे. विजय गो. आश्विन ००, विल्यम्सन पायचित गो. आश्विन २५, टेलर धावबाद १७, राँची झे. आश्विन गो. जडेजा ८०, सँटेनर झे. रोहित गो. आश्विन ७१, वॉटलिंग पायचित गो. शमी १८, क्रेग त्रि. गो. शमी ०१, सोढी त्रि. गो. आश्विन १७, बोल्ट नाबाद ०२, वॅगनर पायचित गो. आश्विन ००. अवांतर : ३. एकूण : ८७.३ षटकांत सर्व बाद २३६. गडी बाद क्रम : १-२, २-३, ३-४३, ४-५६, ५-१५८, ६-१९४, ७-१९६, ८-२२३, ९-२३६, २०-२३६. गोलंदाजी : शमी ८-२-१८-२, आश्विन ३५.३-५-१३२-६, जडेजा ३४-१७-५८-१, यादव ८-१-२३-०, विजय २-०-३-०.
लक्षवेधी
- डिसेंबर २०१२ ते सप्टेंबर २०१६ पर्यंत घरच्या मैदानावर सलग १२ सामन्यांत भारत अपराजित राहिला आहे. जानेवारी १९७७ ते जानेवारी १९८० दरम्यान सर्वाधिक २० सामन्यांत भारत अपराजित राहिला आहे.
- धावांच्या तुलनेत दोन मोठे विजय भारताने न्यूझीलंडविरुद्ध मिळवले आहेत. १९६७-६८ मध्ये आॅकलंड येथे भारताने किवी संघाला २७२ धावांनी लोळवले होते. १९७६-७७ मध्ये चेन्नईमध्ये भारताने २१६ धावांनी बाजी मारली होती. ग्रीन पार्क येथे मिळवलेला विजय भारताने किवींविरुद्ध घरच्या मैदानावर मिळवलेला दुसरा मोठा विजय ठरला.
- आश्विनने पाचव्यांदा कसोटी सामन्यात दहा बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे हरभजन सिंगनेदेखील १०३ कसोटी खेळताना पाच वेळा सामन्यात दहा बळी घेतले आहेत. विद्यमान प्रशिक्षक आणि माजी कसोटीपटू अनिल कुंबळे यांनी १३२ कसोटी खेळताना भारताकडून सर्वाधिक ८ वेळा अशी कामगिरी केली आहे.
- आश्विनने केवळ ३७ सामन्यांतून पाच वेळा एकाच सामन्यात १० बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याच्याहून कमी सामन्यांत अशी कामगिरी केवळ ३ गोलंदाजांनी केली आहे. जॉर्ज लॉहमन (१६ सामने), सिडनी बर्न्स (२४) आणि क्लेरी ग्रिम्मेट (३५). याव्यतिरिक्त भारताकडून हरभजनने ६८ सामन्यांत पाच वेळा १० बळी घेण्याची कामगिरी केली होती. कुंबळेला याच कामगिरीसाठी ८१ सामने खेळावे लागले.
- २०११ नंतर एकाच सामन्यात १०० हून अधिक धावा आणि किमान ५ बळी मिळवणारा मिशेल सँटेनर न्यूझीलंडचा पहिलाच क्रिकेटपटू ठरला. याआधी अशी कामगिरी डॅनियल व्हिटोरी यांनी केली होती.
- या सामन्याआधी केवळ २ सामन्यांमध्ये अर्धशतकी खेळी झाल्या. कानपूर कसोटीमध्ये भारत व न्यूझीलंड यांनी मिळून १० अर्धशतके झळकावली. यामध्ये ल्यूक राँचीने सर्वाधिक ८० धावा फटकावल्या. १९२७-२८ मध्ये दक्षिण आफ्रिका - इंग्लंड यांच्यात डरबन येथे झालेल्या कसोटीत १३ अर्धशतके झळकले होते. १९६४-६५ मध्ये मुंबईला झालेल्या भारत - आॅस्टे्रलिया सामन्यात ११ अर्धशतके झळकली होती.
- भारताने या सामन्यात विक्रमी १० वेळा पायचित बळी मिळवले. याआधी २००१ मध्ये इडनगार्डनवर झालेल्या ऐतिहासिक सामन्यात भारताने आॅसी संघाविरुद्ध ९ पायचित बळी घेतले होते.
- न्यूझीलंडविरुद्ध आश्विनने तिसऱ्यांदा ६ बळी घेतले. किवी संघाविरुद्ध अशी कामगिरी डेरेक अंडरवूड याने सर्वाधिक ५ वेळा केली आहे. वकार युनूस, मुश्ताक अहमद (दोघेही पाकिस्तान) आणि टोनी लॉक, रायन साइडबॉटम (दोघेही इंग्लंड) यांनीही प्रत्येकी ३ वेळा किवींविरुद्ध ६ बळी घेतले आहेत.
आश्विनचा करिश्मा
सर्वांत वेगवान २०० बळी घेण्याची कामगिरी करणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरलेल्या आश्विनने फिरकीच्या जोरावर किवी फलंदाजांपुढे आव्हान निर्माण केले. पहिल्या डावात चार बळी घेणाऱ्या या आॅफस्पिनरने कारकिर्दीत १९ व्यांदा डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याची कामगिरी केली. आश्विनने पाचव्यांदा सामन्यात १० किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याची कामगिरी करीत हरभजनच्या विक्रमाची बरोबरी साधली.
या क्रमवारीत आश्विनपेक्षा सध्या भारतीय संघाचे प्रशिक्षक असलेले अनिल कुंबळे पुढे आहेत. त्यांनी सर्वाधिक आठ वेळा एका सामन्यात १० किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याचा पराक्रम केला आहे.
आश्विनचे १० बळी
- भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू असलेल्या आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विनने न्यूझीलंडविरुद्ध ग्रीन पार्क कसोटीमध्ये १० बळी घेत भारताच्या ऐतिहासिक ५०० व्या कसोटी सामन्यात संस्मरणीय कामगिरी केली. आश्विनने या सामन्यात पहिल्या डावात ४, तर दुसऱ्या डावात ६ बळी घेतले. आश्विनने ग्रीन पार्क कसोटीमध्ये कारकिर्दीत २०० बळींचा टप्पा गाठला. त्याने १९ वेळा डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याची कामगिरी केली, तर पाचव्यांदा सामन्यांत १० बळी घेण्याचा पराक्रम केला.
- भारताच्या १९७ धावांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अनुभवी आॅफस्पिनर आश्विनने नील वॅगनरला बाद करीत किवी संघाचा डाव गुंडाळला व डावात सहावा बळी घेत भारताला ग्रीन पार्कवर सातवा कसोटी विजय साकारून दिला. आश्विनने किवी संघाच्या दुसऱ्या डावात चौथ्या दिवशी तीन व अखेरच्या दिवशी तीन बळी घेत कसोटीत एकूण १० बळी घेण्याची कामगिरी केली.
- आश्विनने आतापर्यंत ३७ कसोटी सामन्यांत २०३ बळी घेतले आहेत. कुंबळे भारतातर्फे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज आहेत. कुंबळे यांनी १३२ कसोटी सामन्यांत ६१९ बळी घेतले आहेत.
राँची, सँटेनरची
संघर्षपूर्ण खेळी
राँची व सँटेनर यांनी सुरुवातीला सावधगिरी बाळगल्यानंतर आक्रमक पवित्रा स्वीकारला. सँटेनरने जडेजाच्या गोलंदाजीवर षटकारही ठोकला. या दोघांनी सकाळच्या सत्रात २०.४ षटकांत ६५ धावा वसूल केल्या. त्यात पहिल्या तीन षटकांत केवळ ६ धावा केल्या होत्या.
न्यूझीलंडची घसरगुंडी
न्यूझीलंडने सकाळी ४ बाद ९३ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. चौथ्या दिवसअखेर नाबाद असलेले ल्यूक राँची (८०) अणि मिशेल सँटेनर (७१) यांनी पाचव्या दिवशी सकाळी तासभर भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिले नाही, पण यांच्यादरम्यानची पाचव्या विकेटसाठी झालेली १०२ धावांची भागीदारी संपुष्टात आल्यानंतर भारताला विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी वेळ लागला नाही. न्यूझीलंडने अखेरच्या पाच विकेट केवळ ४२ धावांच्या मोबदल्यात गमावल्या.
विजयानंतर
वंदे मातरम्च्या घोषणा
भारतीय संघाने ऐतिहासिक ५०० व्या कसोटी सामन्यात आज सोमवारी न्यूझीलंडविरुद्ध १९७ धावांनी विजय मिळवल्यानंतर ‘भारतमाता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी ग्रीन पार्क स्टेडियम दुमदुमले. भारतीय संघ निवासव्यवस्था असलेल्या हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर फुलांचा वर्षाव करीत खेळाडूंचे स्वागत करण्यात आले. भारतीय खेळाडूंनीही हॉटेलमध्ये विजयाचा आनंद साजरा केला.
अनोखी हॅट््ट्रिक....
भारताने या विजयासह एक प्रकारे हॅट््ट्रिक पूर्ण केली. यापूर्वी ३०० व्या (वर्ष १९९६, अहमदाबाद) कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ६४ धावांनी आणि ४०० व्या (वर्ष २००६, किंग्स्टन) कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा ४९ धावांनी पराभव केला होता. भारताचा कसोटी सामन्यातील हा एकूण १३० वा विजय आहे. भारताने डिसेंबर २०१२ पासून मायदेशात १२ सामन्यांतील विजयाची मालिका कायम राखली. यापैकी भारताने १० सामने जिंकले.
माझ्यासाठी संस्मरणीय सामना : विराट
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने राष्ट्रीय संघाने ऐतिहासिक ५०० व्या कसोटी सामन्यात ग्रीन पार्कमध्ये मिळवलेला विजय संस्मरणीय असल्याचे म्हटले आहे. विराटने विजयाचे श्रेय सांघिक कामगिरीला दिले आहे.
आमच्या संघाने योजनाबद्ध खेळ केला. न्यूझीलंड संघाने आमची चिंता वाढविली होती, असे क्षणही या लढतीत अनुभवले. मी आताही कर्णधारपदाची जबाबदारी कशी सांभाळायची, हे शिकत आहे. क्रिकेट जाणकारांकडून सल्ला घेत असतो.
सुरुवातीला काही लढतींमध्ये आक्रमक पवित्रा स्वीकारला, पण त्यात धावा अधिक बहाल केल्या. आता जर विकेट मिळत नसतील तर संयम बाळगण्याची गरज आहे, याची कल्पना आलेली आहे. अशा स्थितीत धावगतीवर नियंत्रण राखण्यावर लक्ष कें द्रित करणे आवश्यक ठरते. कसोटी क्रिकेटमध्ये याला अधिक महत्त्व आहे. जगातील अव्वल संघ याच नीतीचा अवलंब करतात.’’
कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवण्यासाठी मेहनत घेत आहोत. संघातील प्रत्येक खेळाडू आपली भूमिका चोख बजावत आहे. आश्विन, वृद्धिमान साहा, अमित मिश्रा यांच्यासारखा प्रत्येक खेळाडू संघात योगदान देण्यास प्रयत्नशील आहे आणि त्यामुळेच प्रतिस्पर्धी संघावर दडपण निर्माण करता येते.- विराट कोहली, भारत कर्णधार
भारताने प्रत्येक विभागात वर्चस्व गाजवले : विल्यम्सन
भारताविरुद्ध सोमवारी, पाचव्या व अखेरच्या दिवशी पहिल्या कसोटी सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यामुळे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन निराश झाला. यजमान संघाने प्रत्येक विभागात वर्चस्व गाजवले, अशी प्रतिक्रिया विल्यम्सनने दिली. तो म्हणाला, ‘‘या लढतीत आमच्यासाठी अनेक सकारात्मक बाबी घडल्या असून बरेच काही शिकायला मिळाले. पण, भारताने मात्र प्रत्येक विभागात आमच्या तुलनेत सरस कामगिरी केली. दोन सत्रांमध्ये सामन्यावरील आमची पकड सैल झाली. पहिल्या डावात भारताला ३०० धावांत रोखायला हवे होते.’’ विल्यम्सन म्हणाला, ‘‘ल्यूक राँची व मिशेल सँटेनर यांनी शानदार खेळ केला. दुसऱ्या डावात चेंडू वळत असताना त्यांनी केलेली खेळी विशेष होती. सँटेनरने अष्टपैलू कामगिरी करीत छाप सोडली आणि राँचीने संघात पुनरागमन करताना शानदार खेळ केला.’’
संघातील भूमिकेवर समाधानी : जडेजा
न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या ऐतिहासिक ५०० व्या कसोटी सामन्यातील विजयामध्ये अष्टपैलू कामगिरी करीत सामनावीर ठरलेला रवींद्र जडेजाने संघातील भूमिकेवर समाधान व्यक्त केले.
जडेजाने या लढतीत एकूण सहा बळी घेतले आणि पहिल्या डावात ४२ व दुसऱ्या डावात नाबाद ५० धावांची खेळी केली. या विजयामुळे विशेष आनंद झाला. संघातील माझ्या अष्टपैलू भूमिकेला न्याय देण्यात यशस्वी ठरलो. दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम लढतीत मला बरेच काही शिकायला मिळाले. मी तेथेही अशीच गोलंदाजी केली होती.
फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर गोलंदाजी करताना त्याचा लाभ झाला. या कामगिरीमुळे माझा आत्मविश्वास उंचावण्यास मदत झाली. माझ्या गोलंदाजीमध्ये विविधता होती. संथ खेळपट्टीवर आश्विन शानदार गोलंदाज
आहे. २०० बळींचा टप्पा
गाठणाऱ्या आश्विनचे अभिनंदन करतो.