पाकिस्तानच्या तुरुंगांमध्ये ५४६ भारतीय कैदी
By admin | Published: July 2, 2017 12:50 AM2017-07-02T00:50:57+5:302017-07-02T00:50:57+5:30
जवळपास ५०० मच्छीमारांसह ५४६ भारतीय नागरिक पाकिस्तानात वेगवेगळ्या तुरुंगांत आहेत. पाकिस्तान सरकारने या नागरिकांची यादी
इस्लामाबाद : जवळपास ५०० मच्छीमारांसह ५४६ भारतीय नागरिक पाकिस्तानात वेगवेगळ्या तुरुंगांत आहेत. पाकिस्तान सरकारने या नागरिकांची यादी भारताचे येथील उच्चायुक्त गौतम बंबवाले यांना शनिवारी दिली.
दोन देशांत २१ मे २००८ रोजी झालेल्या करारानुसार ही यादी दिली गेली. भारतीय कैद्यांमध्ये ५२ नागरिक आणि ४९४ मच्छीमार आहेत, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. या करारानुसार दोन्ही देशांना प्रत्येक १ जानेवारी आणि १ जुलै रोजी एकमेकांना कैद्यांची यादी द्यावी लागते. भारत सरकारदेखील नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्यायुक्तांकडे कैद्यांची यादी सुपुर्द केली आहे. या वर्षी एक जानेवारी रोजी पाकिस्तानने भारताला दिलेल्या यादीनुसार ३५१ भारतीय कैदी (५४ नागरिक आणि २९७ मच्छीमार) त्यांच्या ताब्यात होते. या वर्षी ६ जानेवारी रोजी २१९ भारतीय मच्छीमारांना सोडण्यात आले तर १० जुलै रोजी ७७ मच्छीमार आणि एका नागरिकाची सुटका केली जाईल.
जानेवारी महिन्यात पाकिस्तानने २१८ भारतीय मच्छीमारांची सुटका केली होती. तत्पूर्वी भारताने एवढ्याच पाकिस्तानी नागरिकांची सुटका केल्यानंतर पाकिस्ताननेही तसाच प्रतिसाद दिला होता.
भारतात सुमारे ३00 पाकिस्तानी
गुजरातमधील मच्छीमार समुद्रात अनेकदा भारताची सागरी सीमा ओलांडतात, तर कराचीतील मच्छीमार त्यांच्या देशाची सागरी सीमा ओलांडून भारतीय हद्दीत येतात. आजच्या घडीला सुमारे ९0 पाकिस्तानी मच्छीमार आणि अन्य अंदाजे २00 पाक नागरिक भारताच्या विविध तुरुंगांत आहेत.