स्वप्नपूर्ती! Paris Olympics मध्ये दिसणार 'आजी'बाई; ५८ वर्षीय खेळाडू मैदानात, प्रेरणादायी प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 03:52 PM2024-07-13T15:52:04+5:302024-07-13T15:52:48+5:30
Zhiying Zeng Olympic Debut at 58 : येत्या २६ जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिकला सुरुवात होत आहे.
Paris Olympics 2024 : ऑलिम्पिकमध्ये खेळणे म्हणजे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न... येत्या २६ जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिकला सुरुवात होत आहे. ११ ऑगस्ट २०२४ पर्यंत या बहुचर्चित स्पर्धेचा थरार रंगेल. ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवण्यासाठी सर्वच क्षेत्रातील खेळाडू आपल्या जीवाची बाजी लावत असल्याचे दिसतात. खरे तर यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वांना आजीबाई दिसणार आहेत. ५८ वर्षीय या महिला खेळाडूचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणा आहे. चीली या देशातील असलेल्या झीइंग जेंग (Zhiying Zeng) ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. त्या एक टेबल टेनिस प्लेयर आहेत. (zhiying zeng table tennis)
वयाच्या ५८ व्या वर्षी झीइंग यांनी त्यांचे स्वप्न साकार करताना ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला. त्यांनी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी पात्रता मिळवली आहे. त्यांनी टेबल टेनिसमधून संन्यास घेतला होता. मात्र कोरोनाचा काळ त्यांच्यासाठी एक संधी घेऊन आला. या कालावधीत त्यांनी घरी टेबल टेनिसचा सराव करत या खेळाप्रतीची आवड जिवंत ठेवली. लॉकडाऊन संपताच स्थानिक स्पर्धांमध्ये भाग घेत सहज विजय मिळवण्यात त्यांना यश आले. २०२३ पर्यंत त्या देशातील आघाडीच्या खेळाडू बनल्या. मग चिलीच्या राष्ट्रीय संघासाठी त्यांनी पात्रता मिळवली.
'आजी'बाईंची स्वप्नपूर्ती
दरम्यान, झीइंग जेंग यांचा जन्म १९६६ मध्ये चीनमध्ये झाला. लहानपणी त्यांना आईने या खेळाचे धडे दिले. ११ व्या वर्षापासून त्या मोठ्या स्पर्धांमध्ये झळकू लागल्या. १९८३ पर्यंत जेंग यांची चीनच्या राष्ट्रीय टेबल टेनिस संघासाठी निवड झाली आणि मग त्यांनी ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न पाहिले. पण १९८६ मध्ये सुरू झालेल्या 'टू-कलर रूल'मुळे त्यांच्या खेळाला फटका बसला आणि त्यांनी चीनचा राष्ट्रीय संघ सोडला. १९८९ मध्ये एका चिनी प्रशिक्षकाने त्यांना चिलीमधील शाळकरी मुलांना प्रशिक्षण देण्याची नोकरी दिली. त्यानंतर झीइंग जेंग यांनी चिलीमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि नंतर चिनी वस्तूंच्या आयात व्यवसायात स्वत:ला झोकून दिले. २०२२ मध्ये जेंग यांनी पुन्हा एकदा टेबल टेनिस या खेळाकडे आपला मोर्चा वळवला. जेणेकरून त्यांच्या मुलाला लागलेली व्हिडीओ गेमची सवय सुटावी हा त्यामागील उद्देश होता. तिथूनच त्यांचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास सुरू झाला.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतालाही चांगल्या पदकांची आशा असेल. मागील अर्थात टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने सात पदके जिंकली होती. नीरज चोप्राच्या रूपात भारतात एकमेव सुवर्ण पदक आले. तर दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांनी भारतीयांना जल्लोष करण्याची संधी दिली.