पहिल्या-वहिल्या पिकलबॉल लीगची घोषणा! सहा संघ भिडणार; प्रसिद्ध अभिनेत्री बनली मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 12:46 PM2024-08-21T12:46:51+5:302024-08-21T12:47:41+5:30

अकरा वर्षांपूर्वी अर्थात २०१३ अंधेरी येथे पिकलबॉलची राष्ट्रीय स्पर्धा पार पडली होती. 

A six-team pickleball premier league has been announced and actress Samantha Prabhu has taken over the Chennai franchise | पहिल्या-वहिल्या पिकलबॉल लीगची घोषणा! सहा संघ भिडणार; प्रसिद्ध अभिनेत्री बनली मालकीण

पहिल्या-वहिल्या पिकलबॉल लीगची घोषणा! सहा संघ भिडणार; प्रसिद्ध अभिनेत्री बनली मालकीण

क्रिकेटप्रेमी असलेल्या भारत देशात क्रिकेटच्या तुलनेत इतर खेळांना म्हणावी तशी प्रगती करता आली नाही. याचे कारणही तितकेच सोपे असून, तमाम भारतीयांनी क्रिकेटवर भरभरून प्रेम केले. याची सोप्या शब्दांत मांडणी म्हणजे जगात सर्वात श्रीमंत असलेले भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय. पण, मागील काही वर्षांपासून इतरही खेळ भारतीयांना आपल्याकडे आकर्षित करताना दिसत आहेत. जागतिक पातळीवर झपाट्याने लोकप्रिय होत असलेला पिकलबॉल खेळ हा त्यातीलच एक भाग होय. या खेळाला आणखी लोकप्रिय करण्याच्या हेतूने वर्ल्ड पिकलबॉल लीगचे आयोजन करण्यात आले आहे. अकरा वर्षांपूर्वी अर्थात २०१३ अंधेरी येथे पिकलबॉलची राष्ट्रीय स्पर्धा पार पडली होती. 

गौरव नाटेकर, जे भारताचे माजी टेनिसपटू आहेत, त्यांच्या पुढाकाराने या लीगची घोषणा करण्यात आली. सहा संघांची पिकलबॉल लीग सर्वांचे लक्ष वेधत आहे. अखिल भारतीय पिकलबॉल संघटनेचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांची यावेळी उपस्थिती होती. २४ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ दरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेत मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, पुणे, अहमदाबाद या सात शहरांमधून सहा शहरांच्या फ्रँचायझीची निवड केली जाईल. पिकलबॉलची चाहती असलेली अभिनेत्री समंथा प्रभूने चेन्नईची फ्रँचायझी खरेदी करून खाते उघडले. 

पिकलबॉल लीगची घोषणा
नाटेकर स्पोर्ट्स अँड गेमिंगच्या मालकीच्या वर्ल्ड पिकलबॉल लीगने (WPBL) चेन्नई फ्रँचायझीची मालकीण म्हणून अभिनेत्री समंथा रुथ प्रभूची घोषणा केली. आपल्या अप्रतिम अभिनयाने चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या समंथाने आता वर्ल्ड पिकलबॉल लीगमध्ये प्रवेश केला. स्पर्धेच्या प्रचारासाठी मी शक्य झाल्यास अभिनेता आमिर खानला आमंत्रित करेन, असे समंथाने यावेळी सांगितले.

गौरव नाटेकर म्हणाले की, या लीगमध्ये सहा संघ असतील, मी सात शहरांची नावे समोर ठेवली आहेत. यातील सहा संघांची निवड होईल, एका संघाला वगळले जाईल. पहिल्या दोन हंगामांसाठी केवळ सहाच संघ असतील हे निश्चित. समंथाने चेन्नईचा संघ घेतला आहे, इतर पाच संघ घेण्यासाठी अनेकांनी रस दाखवला आहे. ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशन खेळाडूंची निवड करेल. गुणवान खेळाडूंना संधी देण्याचे काम आम्ही करू. प्रत्येक फ्रँचायझीच्या शहरांमध्ये आम्ही दोन राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा घेणार आहोत. एकूण १२ स्पर्धा होतील. मी टेनिस खेळाडू होतो मग कालांतराने पिकलबॉलमध्येही आवड निर्माण झाली. सहकाऱ्यांनी याबद्दल माहिती दिल्याने रस वाढत गेला. अमेरिका आणि कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणात हा खेळ खेळला जातो. भारतात देखील कोरोना नंतर पिकलबॉल खेळ प्रसिद्ध होत गेला. मला वाटते की, पुढच्या तीन-चार वर्षात हा भारतातील सर्वात लोकप्रिय तिसऱ्या क्रमांकाचा खेळ होईल. 

Web Title: A six-team pickleball premier league has been announced and actress Samantha Prabhu has taken over the Chennai franchise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tennisटेनिस