एबीला अमला भारी! पंजाबचा सलग दुसरा विजय
By admin | Published: April 10, 2017 11:00 PM2017-04-10T23:00:02+5:302017-04-10T23:00:02+5:30
रॉयल चॅलेजर्स मात करत किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएलमध्ये सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली
Next
>ऑनलाइन लोकमत
इंदूर, दि. 10 - रॉयल चॅलेजर्स मात करत किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएलमध्ये सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. बंगळुरूने विजयासाठी दिलेल्या 149 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हाशिम अमला, ग्लेन मॅक्सवेल आणि मनन व्होरा यांनी केलेल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर पंजाबने 8 गडी राखून विजय मिळवला.
149 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मनन व्होरा (34) आणि हाशिम अमलाने पंजाबला आक्रमक सुरुवात करून दिली. दोघांनीही 6 षटकात 62 धावा कुटत पंजाबच्या विजयाची पायाभरणी केली. त्यानंतर व्होरा (34) आणि अक्षर पटेल (9) झटपट बाद झाले. पण हाशिम अमला (नाबाद 58 ) आणि ग्लेन मॅक्सवेल (नाबाद 43) यांनी तिसऱ्या विकेटसाठी अभेद्य 72 धावांची भागीदारी करत पंजाबला 15व्या षटकातच विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी आयपीएलमध्ये प्रेक्षकांना आज पुन्हा एकदा एबी डीव्हिलियर्सच्या तुफान फटकेबाजीचा नजराणा पाहता आला. आघाडीच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केल्यानंतर एबी डीव्हिलियर्सने केलेल्या घणाघाताच्या जोरावर बंगळुरूने किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर विजयासाठी 149 धावांचे आव्हान ठेवले होते. एबीने अवघ्या 46 चेंडूत तीन चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने नाबाद 89 धावा कुटल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर बंगळुरुची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार शेन वॉटसन (1) पहिल्याच षटकात माघारी परतला. विष्णू विनोद (7) आणि केदार जाधव (1) हेही झटपट बाद झाले. तीन फलंदाज बाद झाल्यावर एबी डीव्हिलियर्स आणि मनदीप सिंग (28) यांनी सावध फलंदाजी करत संघाला सावरले. पण या दोघांनाही वेगाने धावा जमवता अल्या नाहीत. त्यातच मनदीप सिंग मोक्याच्या क्षणी बाद झाल्याने बंगळुरूच्या अडचणी अधिकच वाढल्या. पण एबी आणि स्टुअर्ट बिन्नीने अखेरच्या 4 षटकांत 68 धावा कुटत बंगळुरूला 148 धावांपर्यंत मजल मारून दिली.