‘टॉप’च्या प्रमुखपदी अभिनव बिंद्रा
By admin | Published: January 28, 2017 12:36 AM2017-01-28T00:36:08+5:302017-01-28T00:36:08+5:30
बीजिंग आॅलिम्पिकचा सुवर्ण विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याची केंद्र सरकारने पुनर्गठित टार्गेट आॅलिम्पिक पोडियम(टॉप) समितीच्या प्रमुखपदी शुक्रवारी निवड
नवी दिल्ली : बीजिंग आॅलिम्पिकचा सुवर्ण विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याची केंद्र सरकारने पुनर्गठित टार्गेट आॅलिम्पिक पोडियम(टॉप) समितीच्या प्रमुखपदी शुक्रवारी निवड केली. पी.टी. उषा आणि प्रकाश पदुकोण यांचा देखील समितीत समावेश आहे.
बिंद्रा हा मागच्या समितीचा देखील प्रमुख होता पण त्याने २०१६ च्या रिओ आॅलिम्पिकवर लक्ष केंद्रित करण्यासाठी समितीचा राजीनामा दिला होता. दहा सदस्यांच्या समितीत अन्य दोन खेळाडू नेमबाज अंजली भागवत आणि सिडनी आॅलिम्पिकची कांस्य विजेती कर्णम मल्लेश्वरी यांचा तसेच टेनिस महासंघाचे अध्यक्ष सी. के. खन्ना, बॉक्सिंगमधील प्रशासक के. मुरलीधरन राजा, रेल्वे बोर्डाच्या सचिव रेखा यादव, साईचे कार्यकारी संचालक एस. एस. रॉय, संयुक्त क्रीडा सचिव इंदर धमीजा आदींचा समावेश आहे.
ही समिती खेळाडू निवडीची पद्धत स्वत: निश्चित करेल. गरज भासल्यास तज्ज्ञांना पाचारण करेल. समितीचा कार्यकाळ एक वर्षाचा असेल.
२०२० आणि २०२४ च्या आॅलिम्पिकसाठी पदक विजेत्यांचा शोध घेणे हा टॉपचा उद्देश आहे. ही योजना आधी २०१६ आणि २०२० च्या आॅलिम्पिकला डोळ्यापुढे ठेवून आखण्यात आली होती. (वृत्तसंस्था)