आशियाई नेमबाजीत अभिनव बिंद्राला सुवर्ण
By admin | Published: September 28, 2015 01:40 AM2015-09-28T01:40:21+5:302015-09-28T01:40:21+5:30
आॅलिम्पिक सुवर्ण विजेता‘ गोल्डन बॉय’ अभिनव बिंद्रा याने आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेत रविवारी दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले
नवी दिल्ली : आॅलिम्पिक सुवर्ण विजेता‘ गोल्डन बॉय’ अभिनव बिंद्रा याने आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेत रविवारी दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले.
डॉ. कर्णिसिंग शुटिंग रेंजमध्ये बिंद्राने २०८.८ गुणांसह सुवर्णांवर नेम साधला. लंडन आॅलिम्पिकचा कांस्य विजेता गगन नारंग हा चौथ्या आणि चैनसिंग सहाव्या स्थानावर राहिले. बिंद्रा, नारंग आणि चैनसिंग हे २०१६ च्या रियो आॅलिम्पिकसाठी आधीच पात्र ठरले आहेत.
३२ वर्षांच्या बिंद्रापाठोपाठ कझाखस्तानचा विश्व क्रमवारीत आठव्या स्थानावरील युरकोव्ह युकिरी याने २०६.६ गुणांसह दुसरे आणि कोरियाचा यू जीचूल १८५.३ याने तिसरे स्थान मिळविले. लंडन आॅलिम्पिकमध्ये याच प्रकारात कांस्य जिंकणाऱ्या नारंगला १६४.५ गुण मिळाल्याने तो चौथ्या स्थानावर घसरला. चैनसिंग हा १२२.७ गुणांसह सहाव्या स्थानावर आला. नारंगने १०.६ गुणांचे दोन शॉट मारून चांगली सुरुवात केली खरी पण पुढच्या प्रयत्नांत तो माघारला. चैनसिंग याला शूट आॅफमध्ये कोरियाच्या खेळाडूने मागे टाकले. बिंद्रा याने चांगली कामगिरी कायम ठेवून सर्वच प्रतिस्पर्धी खेळाडूंना मागे टाकले.
गगनसोबत कुठल्याही प्रकारची स्पर्धा नसल्याचे स्पष्ट करीत अभिनव म्हणाला,‘असे केवळ मीडियात वाचायला मिळते.’ भारताचे रायफल कोच स्टेनिसलाव लेपिड्स यांना बिंद्राच्या कर्तृत्वावर शंका नव्हतीच. ते म्हणाले,‘या निकालाबद्दल मला शंका नव्हतीच. या प्रकारात गगनला देखील यश मिळावे, अशी मला अपेक्षा होती. गगन भविष्याची तयारी करीत आहे.’
भारताने १० मीटर एअर रायफलचे सांघिक सुवर्णदेखील जिंकले. बिंद्रा, नारंग आणि चैनसिंग यांच्या जोडीने १८६८.६ गुणांसह अव्वल स्थान घेतले. कोरिया संघ दुसऱ्या आणि सौदी अरब संघ तिसऱ्या स्थानावर आला. भारताने युवा गटात एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांची कमाई केली.
ज्युनियर गटातही दोन रौप्य पदके मिळाली. सत्यजित कंडोल याने १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण जिंकले. त्याने २०४.८ गुण, चायनीज तायपेईचा शाओ चुआन लू याने २०३.७ आणि इराणचा दवोद अबाली अब्बासाली याने १८३.८ गुण मिळविले. कंडोल, मिथिलेश आणि गजेंद्र राज यांनी याच प्रकारात १८२७.७ गुणांसह रौप्य पदकाची कमाई केली. कोरियाने सुवर्ण जिंकले. ज्युनियर गटात प्रणतिक बोस याने २०३.९ गुणांसह रौप्य जिंकले. इराण आणि कोरियाच्या खेळाडूंनी क्रमश: सुवर्ण आणि कांस्य पटकाविले. बोसने यानंतर प्रशांत आणि अखिल शेरॉन यांच्या सोबतीने सांघिक प्रकराचे रौप्य पटकावले. इराणचा संघ अव्वल स्थानावर राहिला. कोरियाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.(वृत्तसंस्था)