अभिजित कटके यंदाचा महाराष्ट्र केसरी, अंतिम लढतीत किरण भगतला केले चितपट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 07:12 PM2017-12-24T19:12:14+5:302017-12-24T19:21:53+5:30
पुण्याचा पैलवान अभिजित कटके यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. अभिजित कटकेने एकतर्फी झालेल्या अंतिम लढतीत साताऱ्याच्या किरण भगतला चितपट करत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली.
पुणे - पुण्याचा पैलवान अभिजित कटके यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. अभिजित कटकेने एकतर्फी झालेल्या अंतिम लढतीत साताऱ्याच्या किरण भगतला चितपट करत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली. अभिजित कटके आणि किरण भगत यांच्यातील अंतिम लढ सुरवातीला अटीतटीची झाली. मात्र अभिजित कटकेने किरणला चितपट करत 10 विरुद्ध 7 गुणांची आघाडी घेत विजेतेपदावर कब्जा केला.
काल झालेल्या गादी आणि माती विभागाच्या अंतिम लढतींमध्ये अनुक्रमे अभिजित कटके आणि किरण भगत यांनी विजय मिळवले होते. गादी विभागात अंतिम फेरीच्या लढतीत अभिजित कटकेने सुरुवातीपासून घेतलेला आक्रमक पवित्रा त्याच्या एकतर्फी विजयाचा शिल्पकार ठरला होता.. आपल्या उंचीचा आणि भक्कम ताकदीचा उपयोग करत अभिजितने एकेरी पट, भारंदाज हप्ते डाव करत १० गुण मिळवून तांत्रिक गुणाधिक्यावर विजय मिळवित सलग दुस-या वर्षी महाराष्ट्र केसरी किताबाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती.
दुस-या बाजूला साता-याच्या किरण भगतने प्रेक्षणीय लढती करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. माती विभागात अंतिम फेरीत बलाढ्य ताकदीचा बाला रफीक शेख याच्याबरोबर दिलेली चिवट झुंज त्याच्या वर्षभराच्या मेहनतीचे फळ देऊन गेली. आपल्या झुंजार खेळाच्या प्रदर्शनाने किरण भगतने अनपेक्षित अशी आक्रमणे करत बाला रफीकला हतबल केले आणि डोळ््याच्या पापण्या मिटण्याइतक्या अवधीत एकेरी कस काढून चितपट करीत माती विभागातून महाराष्ट्र केसरी किताबाच्या अंतिम लढतीसही आपले आव्हान उभे केले होते.