अभिषेक नायरने मुंबईकरांना तारले
By admin | Published: December 28, 2016 03:09 AM2016-12-28T03:09:51+5:302016-12-28T03:09:51+5:30
अष्टपैलू अभिषेक नायरने प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर बलाढ्य मुंबईने हैदराबादचा झुंजार प्रतिकार ३० धावांनी मोडून काढताना रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या
रायपूर : अष्टपैलू अभिषेक नायरने प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर बलाढ्य मुंबईने हैदराबादचा झुंजार प्रतिकार ३० धावांनी मोडून काढताना रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. नायरने ४० धावांमध्ये ५ बळी घेतले. तर, युवा फिरकीपटू विजय गोहिलनेही ६४ धावांत ५ बळी घेत हैदराबादचे आव्हान संपुष्टात आणण्यात योगदान दिले.
मुंबईने दिलेल्या २३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा डाव २०१ धावांत संपुष्टात आला. चौथ्या दिवशी नाबाद राहिलेल्या बी. अनिरुध्दने १८७ चेंडूत ४ चौकार व २ षटकारांसह सर्वाधिक ८४ धावांची शानदार खेळी केली. परंतु, संघाला विजयी करण्यास तो अपयशी ठरला. पाचव्या दिवशी हैदराबादने ७ बाद १२१ धावांवरुन खेळण्यास सुरु केली. यावेळी त्यांना विजयासाठी १११ धावांची गरज होती व त्यांच्या सर्व आशा अनिरुध्दवर होत्या. मात्र, नायरने अचूक मारा करताना उर्वरीत तिन्ही बळी घेत हैदराबादच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले.
अनिरुध्द आणि चामा मिलिंद (२९) यांनी आठव्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी करुन हैदराबादच्या आशा उंचावल्या. यावेळी मुंबईवर देखील दडपण आले. परंतु, नायरने मिलिंदला बाद करुन ही जोडी फोडली.
यानंतर लगेच मोहम्मद सिराजला भोपळा ही न फोडू देता पायचीत पकडले. झटपट दोन बळी गेल्यानंतर अनिरुध्दवर दडपण आले. अखेरचा फलंदाज रवि किरणसह (१) त्याने १६ धावांची भागीदारी केली. मात्र, नायरने किरणचाही अडसर दूर करताना त्याला आदित्य तरेकरवी झेल बाद करुन मुंबईचा उपांत्य प्रवेश निश्चित केला. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक : मुंबई (पहिला डाव) : १०१.४ षटकात सर्वबाद २९४ धावा. हैदराबाद (पहिला डाव) : १२५.१ षटकात २८० धावा. मुंबई (दुसरा डाव) : ८३.२ षटकात सर्वबाद २१७ धावा (आदित्य तरे ५७, आदित्य तरे ४६; मोहम्मद सिराज ५/५२). हैदराबाद (दुसरा डाव) : ७१ षटकात सर्वबाद २०१ धावा (बी. अनिरुध्द नाबाद ८४, बी. संदीप २५; अभिषेक नायर ५/४०, विजय गोहिल ५/६४)