अचूक वेध घेण्याची क्षमता...

By admin | Published: July 28, 2016 04:08 AM2016-07-28T04:08:15+5:302016-07-28T04:08:15+5:30

अगदी पौराणिक काळापासून इतिहास असलेला म्हणून ओळखला जाणारा खेळ म्हणजे धनुर्विद्या म्हणजेच तिरंदाजी. आधुनिक तिरंदाजी १९७० मध्ये भारतात आल्यानंतर हळूहळू

The ability to take a precise look ... | अचूक वेध घेण्याची क्षमता...

अचूक वेध घेण्याची क्षमता...

Next

- रोहित नाईक, मुंबई

अगदी पौराणिक काळापासून इतिहास असलेला म्हणून ओळखला जाणारा खेळ म्हणजे धनुर्विद्या म्हणजेच तिरंदाजी. आधुनिक तिरंदाजी १९७० मध्ये भारतात आल्यानंतर हळूहळू या खेळाने येथे पाय रोवण्यास सुरुवात केली. त्यानंतर सातत्याने राष्ट्रीय स्पर्धांद्वारे भारतीयांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली. यंदाच्या रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताचे एकूण ४ खेळाडू तिरंदाजीमध्ये सहभागी होणार असून यामध्ये केवळ एकच पुरुष खेळाडू आहे, हे विशेष. दीपिकाकुमारी, लक्ष्मीरानी माझी आणि बोम्बायलादेवी हे बलाढ्य खेळाडू वैयक्तिक, तसेच सांघिक प्रकारात पदकासाठी प्रयत्न करतील, तर अतानु दास पुरुष वैयक्तिक गटात कसब दाखवेल. दखल घेण्याची म्हणजे आंतरराष्ट्रीयस्तरावर स्वत:चा दबदबा निर्माण केलेल्या महिला भारतीय संघाकडून पदकाच्या सर्वाधिक आशा असल्याने त्यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल.
१९९२ मध्ये झालेल्या बार्सिलोना आॅलिम्पिकमध्ये भारतीयांनी प्रथम आपली दखल घेण्यास भाग पाडली. लिम्बाराम याने जगातील अव्वल ६ खेळाडूंमधून नामांकन मिळवताना आपली छाप पाडली. परंतु, पदक मिळवण्यात तो अपयशी ठरला. या वेळी त्याने ७० मी. प्रकारात ३६० पैकी ३३६ गुणांचा वेध घेत दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. मात्र, नव्याने तयार करण्यात आलेल्या नियमांचा फटका बसल्याने मोक्याच्या वेळी तो अपयशी ठरला. मात्र यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय चांगलेच बहरले.
रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताच्या महिला संघाची बलाढ्य संघांमध्ये गणना होत आहे. एकेकाळी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर कब्जा केलेली दीपिका सध्या सातव्या स्थानी असली तरी, जेव्हा तिचा दिवस असतो तेव्हा ती सर्वांपेक्षा सरस ठरते. त्यामुळेच तिची क्षमता जाणून असलेले इतर प्रतिस्पर्ध्यांना तिचा विशेष धसका असेल. गेल्या वर्षी शांघायला झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत तिने वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली होती. २००६ मध्ये व्यावसायिक खेळाडू म्हणून कारकीर्द सुरू केल्यानंतर दीपिकाने २००९ मध्ये कॅडेट वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकून अशी कामगिरी करणारी दुसरी भारतीय ठरली. त्याचवर्षी दीपिकाने ११ व्या जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेचे विजेतेपदही पटकावले. २०१० मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पटकावल्यानंतर दोन वर्षांनी तिने आपले पहिले विश्वविजेतेपद पटकावले. याआधी लंडन आॅलिम्पिकमध्ये सहभाग घेतलेल्या दीपिकाने त्या वेळी ८ व्या स्थानी मजल मारली होती.
अनुभवी बोम्बायलादेवीची पुरेपूर साथ यंदा दीपिकाला लाभेल. दीपिका आणि बोम्बायला या दोघांचा अनुभव आणि लक्ष्मीरानी माझीचा जोष या जोरावर भारतीय संघ नक्की चमकदार कामगिरी करेल. बीजिंग आॅलिम्पिकमध्ये सहभाग घेतलेल्या बोम्बायलादेवीला त्या वेळी सांघिक व वैयक्तिक प्रकाराची अंतिम फेरी गाठता आली नाही. कोपनहेगन येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी सांघिक स्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळवून देऊन बोम्बायलाने चांगली कामगिरी केली होती. सांघिक प्रकारात लक्ष्मीरानी माझीवरही भारताची खूप मदार असेल. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मोक्याच्या वेळी घेतलेल्या अचूक वेधामुळे भारताला रौप्य जिंकण्यात यश आले. त्याचवेळी वैयक्तिक गटातही आपल्याहून बलाढ्य खेळाडूंना धक्का देण्याची क्षमता राखून असल्याने लक्ष्मीरानीकडून चमत्कार घडल्यास आश्चर्य वाटायला नको. सातत्याने १० गुणांचा वेध घेण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्मीचा खेळ नक्कीच भारतासाठी निर्णायक ठरणारा असेल.


अतानु दास
रिओ आॅलिम्पिकमध्ये एकमेव भारतीय पुरुष तिरंदाज म्हणून अतानुवर पदकाच्या आशा असतील. भारताचा एकमेव खेळाडू असल्याने त्याच्यावर काही प्रमाणात नक्कीच दडपण असेल.
वैयक्तिकच्या तुलनेत सांघिक प्रकारामध्ये लक्षवेधी कामगिरी केलेल्या अतानुने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन रौप्य व एक कांस्य अशी ३ आणि विश्वचषक स्पर्धेत प्रत्येकी २ रौप्य व कांस्य अशी ४ पदके जिंकली आहेत. त्यामुळेच आता आॅलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात त्याची कामगिरी कशी होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
आॅलिम्पिकसाठी भारतीय तिरंदाजी संघटनेच्या (एएआय) वतीने घेण्यात निवड चाचणी स्पर्धेत डार्क हॉर्स म्हणून सहभागी झालेल्या अतानुने माजी आॅलिम्पियन चाम्पिया आणि जयंता तालुकदार अशा बलाढ्य खेळाडूंना धक्का देण्याचा पराक्रम करून रिओ तिकीट मिळवले. त्यामुळेच त्याच्याकडूनही पदकवेध होण्याचे संकेत आहेत.

Web Title: The ability to take a precise look ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.