डीआरएस स्वीकारा
By admin | Published: December 22, 2014 04:52 AM2014-12-22T04:52:41+5:302014-12-22T04:52:41+5:30
आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत काही निर्णय भारताच्या विरोधात गेल्यानंतर आजी व माजी क्रिकेटपटूंच्या मते,
नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत काही निर्णय भारताच्या विरोधात गेल्यानंतर आजी व माजी क्रिकेटपटूंच्या मते, आता वादग्रस्त डीआरएस (पंचांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची पद्धत) पद्धतीचा स्वीकार करण्याची वेळ आलेली आहे. ‘बीसीसीआय’ने ‘डीआरएस’चा स्वीकार केला नाही तर त्याचा फटका संघाला बसत आहे, असे मत आजी-माजी खेळाडूंनी व्यक्त केले आहे.
भारताच्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या व्हीव्हीएस लक्ष्मणचा अद्याप डीआरएसला विरोध कायम आहे.
लक्ष्मण म्हणाला, ‘फुलप्रुफ प्रणालीचे स्वागत आहे. माझा डीआरएसला विरोध नाही, पण यामध्ये अचूकता येण्यासाठी बराच मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. हॉटस्पॉट व हॉक आयबाबत अद्याप मला विश्वास नाही. हॉक आयमध्ये पायचितच्या निर्णयाबाबत चेंडूची दिशा निश्चित होते. जोपर्यंत निर्णय समीक्षा प्रणालीमध्ये या दोन महत्त्वाच्या तंत्रांबाबत अचूकता येत नाही तोपर्यंत डीआरएसच्या उपयोगासाठी मंजुरी देताना गंभीरतेने विचार होणे आवश्यक आहे.’
भारताचा अन्य माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर म्हणाला, ‘सुरुवातीला माझा डीआरएसला विरोध होता, पण अॅडिलेल व ब्रिस्बेन कसोटी सामन्यांत पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे याचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचे वाटते.
डीआरएस पूर्णपणे अचूक नाही, याची कल्पना आहे, पण आता या तंत्राचा आपण स्वीकार करायला हवा. अनेक सोपे निर्णय आपल्या विरोधात जात आहेत. त्यामुळे मालिकेत आपले मोठे नुकसान झाले आहे. पंचगिरी चांगली नसल्यामुळे बॅड-पॅड निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. पहिल्या कसोटी सामन्यात काही चुका झाल्या. आता डीआरएसचा स्वीकार करणे आवश्यक आहे.’
माजी फिरकीपटू ईरापल्ली प्रसन्ना व सलामीवीर चेतन चौहान यांनी डीआरएसचा स्वीकार करण्याच्या बाजूने मत व्यक्त केले.
प्रसन्ना म्हणाले, ‘सुरुवातीपासून मी डीआरएसच्या बाजूने आहे. याचा उपयोग का करण्यात येत नाही, याबाबत बीसीसीआयला विचारणे योग्य ठरेल.’
चौहान म्हणाले, ‘क्रिकेटमध्ये एक चुकीचा निर्णय सामन्याचा निकाल बदलण्यासाठी पुरेसा असतो. मी सुरुवातीपासून डीआरएसला पद्धतीचा अवलंब करण्याच्या बाजूने आहे. याचा आहे त्यास्थितीत स्वीकार करा किंवा तांत्रिक समितीला यामध्ये अचूकता आणण्यासाठी कार्य करू द्या. ’ (वृत्तसंस्था)