सामनाधिकाऱ्यांनुसार क्वीन्स ओव्हलचे मैदान खराब
By admin | Published: August 24, 2016 08:20 PM2016-08-24T20:20:48+5:302016-08-24T20:20:48+5:30
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात झालेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्याचे स्थळ क्वीन्स ओव्हलचे मैदान हे खराब असल्याचे सामनाधिकाऱ्यांनी घोषित केले.
ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 24 : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात झालेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्याचे स्थळ क्वीन्स ओव्हलचे मैदान हे खराब असल्याचे सामनाधिकाऱ्यांनी घोषित केले.
पावसामुळे क्वीन्स ओव्हल मैदानावर भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात झालेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी फक्त २२ षटकांचाच सामना होऊ शकला. त्यानंतर मैदान खराब झाल्यामुळे सलग चार दिवस खेळ होऊ शकला नव्हता आणि सामना अनिर्णीत अवस्थेत पार पडला होता. हा सामना अनिर्णीत राहिल्यामुळे भारताला कसोटी रँकिंगमध्ये आपले अव्वल स्थान गमवावे लागले.
सामनाधिकाऱ्यांनी क्वीन्स ओव्हल मैदानाशिवाय दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटीचे दरबान येथील किंग्समीड मैदानदेखील खराब असल्याचे घोषित केले आहे. आयसीसीच्या मॅच रेफरीचे एलिट पॅनलचे सदस्य अँडी पाइक्रॉफ्ट आणि रंजन मदुगले यांनी आयसीसीला सोपवण्यात आलेल्या आपल्या अहवालात हे दोन्ही मैदान खराब असल्याचे सांगताना त्यावर आपली चिंता व्यक्त केली आहे.
आयसीसीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले, हा अहवाल आता दक्षिण आफ्रिका (सीएसए) आणि वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड (डब्ल्यूआयसीबी)ला पाठवला आहे आणि त्यांना अहवालाचे उत्तर देण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. आयसीसीचे जनरल मॅनेजर (क्रिकेट) ज्योफ एलरडाईस आणि मदुगले सीएसएच्या उत्तराचे समीक्षण करतील आणि एलरडाईस व डेव्हिड बून डे डब्ल्यूआयसीसीबीच्या उत्तराचे आकलन करतील.