सचिन तेंडुलकरच्या मते विरोधी संघातील 'हा' कर्णधार सर्वोत्तम
By Admin | Published: February 17, 2017 02:20 PM2017-02-17T14:20:24+5:302017-02-17T14:49:12+5:30
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने इंग्लंडच्या माजी खेळाडूला सर्वोत्तम कर्णधाराचा खिताब दिला आहे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने इंग्लंडचा माजी खेळाडू नासीर हुसेनला सर्वोत्तम कर्णधाराचा किताब दिला आहे. 'आपल्या 24 वर्षाच्या कारकिर्दीत विरोधी संघाच्या अनेक कर्णधारांना आपण सामोरे गेलो, त्यामध्ये नासीर हुसेन हा सर्वोत्तम होता', असं सचिनने सांगितलं आहे. 'नासीर हा एक उत्तम व्यूहरचनाकार तसंच विचार करुन खेळणारा खेळाडू होता', असं सचिनने त्याचं आत्मचरित्र 'प्लेईंग इट माय वे' याच्यात लिहिलं आहे.
नासीर हुसेनचा जन्म भारतात चेन्नईमध्ये झालेला आहे. नासीरने 1989 ते 2004 या कार्यकाळात 96 कसोटी तर 88 एकदिवसीय सामने खेळले आहेत. आपल्या क्रिकेट करिअरमध्ये नासीरने कसोटीत 5764 आणि वन-डेमध्ये 2332 धावा केल्या आहेत. नासीरने एकूण 15 आंतरराष्ट्रीय शतकं लगावली आहेत.
'एखाद्या फलंदाजाने ठराविक ठिकाणी शॉट मारला म्हणून नासीर त्या ठिकाणी लगेच फिल्डिंग लावत नसे. नासीरला एखादा खेळाडू कोणता शॉट खेळेल याची कल्पना असायची, आणि अगोदरच त्या ठिकाणी त्याने फिल्डर उभा केलेला असायचा. यामुळे त्याच्या संघात फरक पडत होता', असं सचिनने म्हटलं आहे.
सचिनने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क याचंही कौतुक केलं आहे. इतकंच नाही तर मार्क टेलर, स्टीव्ह वॉ आणि रिकी पाँटिंग यांच्यापेक्षा मायकल क्लार्क सर्वश्रेष्ठ असल्याचं म्हटलं आहे.
'ऑस्ट्रेलियाविरोधात खेळलेल्या कर्णधारांमध्ये मायकल क्लार्क सर्वोत्तम होता. मार्क टेलर, स्टीव्ह वॉक आणि रिकी पाँटिंग यांच्या संघात आमच्या काळातील उत्तम खेळाडू असल्याने त्यांना त्याचा फायदा झाला. इतके मॅच विनर्स संघात असल्याने कर्णधाराला सोपं जातं आणि त्याच्यावरचा भार कमी होतो', असं सचिनचं म्हणणं आहे.