हिशेब चुकता, चुरस कायम!

By admin | Published: January 30, 2017 03:41 AM2017-01-30T03:41:36+5:302017-01-30T04:15:22+5:30

जे कानपुरात घडले त्याची पुनरावृत्ती रविवारी नागपुरात होणार की काय, अशी परिस्थिती ओढवली असतानाच जसप्रीत बुमराह आणि आशिष नेहरा मदतीला धावले

Account reckoning, chaos persisted! | हिशेब चुकता, चुरस कायम!

हिशेब चुकता, चुरस कायम!

Next

किशोर बागडे, नागपूर
जे कानपुरात घडले त्याची पुनरावृत्ती रविवारी नागपुरात होणार की काय, अशी परिस्थिती ओढवली असतानाच जसप्रीत बुमराह आणि आशिष नेहरा मदतीला धावले. बुमराहने मोक्याच्या क्षणी १२ चेंडूंत पाच धावांत दोन गडी बाद करीत भारताला रविवारी येथील व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या टी-२० लढतीत इंग्लंडविरुद्ध पाच धावांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला. विराट अ‍ॅन्ड कंपनीने दडपणातही गोलंदाजीत कामगिरी उंचावून मालिकेत चुरस कायम राखली. या विजयामुळे भारताने व्हीसीएवर पराभवाची मालिकादेखील खंडित केली आहे.


नाणेफेक गमाविल्यानंतर लोकेश राहुलच्या ७१ धावांच्या बळावर भारताने २० षटकांत ८ बाद १४४ धावा उभारल्या. इंग्लंडला भारतीय गोलंदाजांनी ६ बाद १३९ धावांत रोखले. बुमराह सामनावीर ठरला.कसोटीपाठोपाठ वन-डे मालिका जिंकणाऱ्या टीम इंडियाला टी-२० मालिकेत आव्हान कायम राखण्याचे लक्ष्य होते. तीन सामन्यांच्या मालिकेतील कानपूरचा पहिला सामना गमाविल्याने १५ महिन्यांत पहिल्यांदा मालिका गमाविण्याची नामुष्की आली होती. ही नामुष्की टाळण्यासाठी विराटच्या नेतृत्वाखालील संघाला व्हीसीएवर इंग्लंडला पराभवाची चव चाखविणे क्रमप्राप्त झाले होते. पहिल्या सामन्यात इंग्लंडने परिपूर्ण खेळ करणाऱ्या पाहुण्यांना भारतीय गोलंदाजांनी चव चाखवित मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. तिसरा आणि निर्णायक टी-२० सामना १ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे खेळला जाईल.

बुमराह-नेहरा विजयाचे शिल्पकार
या प्र्रकारात वरचढ ठरलेल्या इंग्लंडपुढे हे लक्ष्य खुजे होते. चौथ्या षटकापर्यंत २२ धावांत दोन गडी गमावूनही इंग्लंडने १७ षटकांत ४ बाद ११८ धावांपर्यंत मजल गाठल्याने विजय सहज मिळेल, असे वाटत होते. तोच १८ व्या षटकात बुमराहने विजयाचा पाया रचला. या षटकात केवळ तीन धावा देत विजयाच्या आशा जागविल्या. अखेरच्या दोन षटकांत इंग्लंडला २४ धावांची गरज होती. बटलर आणि रुट खेळपट्टीवर होते.

बिलिंग्स आणि रॉय यांना पाठोपाठच्या चेंडूवर बाद करीत अनुभवी नेहराने विजयाच्या आशा पल्लवित केल्या. पण मॉर्गन-रुट यांनी तिसऱ्या गड्यासाठी ४३ धावांची भागीदारी केली. ११ व्या षटकात २३ चेंडूंत १७ धावा काढून कर्णधार मॉर्गन बाद झाला. मिश्राच्या चेंडूवर हार्दिक पांड्याने सीमारेषेजवळ त्याचा झेल टिपला. मॉर्गनची जागा घेणाऱ्या बेन स्टोक्सची अमित मिश्राने चक्क दांडी गूल केली.

पण रिप्लेमध्ये ‘नोबॉल’ दाखविताच भारताची निराशा झाली. चेंडू टाकताना मिश्राचा पाय रेषेबाहेर असल्याचे निष्पन्न होताच
स्टोक्स नाबाद ठरला. चौथ्या गड्यासाठी बेन स्टोक्स आणि ज्यो रुट यांनी ५२ धावांची भागीदारी केली. भारताकडून नेहराने तीन, बुमराहने दोन आणि अमित मिश्राने एक गडी बाद केला.


२० वे षटक ...

१९ व्या षटकातनेहराने १६ धावा बहाल केल्यानंतर
अखेरच्या षटकात बुमराहने पहिल्या चेंडूवर रूटला
(३८ चेंडूंत ३८ धावा, दोन चौकार) पायचित केले.
दुसऱ्या चेंडूवर एक धाव निघाली.
तिसरा चेंडू पुन्हा निर्धाव होता.
चौथ्या चेंडूवर बटलर
त्रिफळाबाद झाला.
पाचव्या चेंडूवर केवळ
एक धाव निघाली.
इंग्लंडला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी सहा धावांची
गरज होती, पण बुमराहने हा
चेंडू निर्धाव टाकताच विजय साकार झाला.



लोकेश राहुलचा धडाका

त्याआधी सलामीवीर लोकेश राहुल याने कानपूर(८ धावा) सामन्यातील अपयश पुसून काढत ४७ चेंडूंवर ७१ धावांची धडाकेबाज खेळी केली. १८ व्या षटकात तो जॉर्डनच्या चेंडूवर बेन स्टोक्सकडे झेल देत बाद झाला. दोनन षटकार व सहा चौकार मारणाऱ्या राहुलने मनीष पांडेसोबत चौथ्या गड्यासाठी ५६ धावांची महत्त्वाची भागीदारी करीत डाव सावरला. पाचव्या स्थानावर आलेल्या मनीष पांडे याने २६ चेंडूंत ३० धावांचे योगदान दिले.

करुण नायर आणि ऋषभ पंत यांच्यासारख्या युवा चेहऱ्यांना डावलून संधी देण्यात आलेले अनुभवी युवराजसिंग आणि सुरेश रैना यांनी चाहत्यांची घोर निराशा केली. रैना १० चेंडूंत सात आणि युवराज १२ चेंडूंत अवघ्या चार धावा काढून परतला. कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्यांदा सलामीला येऊन २१ धावांचे योगदान दिले. विशेष म्हणजे भारताचे केवळ तीनच फलंदाज दुहेरी आकडा गाठण्यात यशस्वी ठरले.

इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डन याने २२ धावांत तीन, तसेच मिल्स, मोईन अली आणि राशिद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. उभय संघांनी प्रत्येकी एक बदल केला होता. भारताने रसूलच्या जागी आॅफस्पिनर अमित मिश्रा याला संधी दिली, तर इंग्लंडने प्लंकेटच्या जागी लियाम डॉसन याला स्थान दिले.


धावफलक
भारत : विराट कोहली झे. डॉसन गो. जॉर्डन २१, लोकेश राहुल झे. स्टोक्स गो. जॉर्डन ७१, सुरेश रैना झे. जॉर्डन गो. राशिद ७, युवराजसिंग पायचित गो. मोईन ४, मनीष पांडे त्रि. गो. मिल्स ३०, महेंद्रसिंह धोनी त्रि. गो. जॉर्डन ५, हार्दिक पांड्या धावबाद २, अवांतर ४, एकूण : २० षटकांत ८ बाद १४४ धावा. गोलंदाजी : लियाम डॉसन २-०-२०-०, मिल्स ४-०-३६-१, जॉर्डन ४-०-२२-३, स्टोक्स ३-०-२१-०, अली ४-०-२०-१, राशिद ३-०-२४-१. इंग्लंड : जेसन रॉय झे. रैना गो. नेहरा १०, बिलिंग्स झे. बुमराह गो, नेहरा १२, ज्यो रुट पायचित गो. बुमराह ३८, बेन स्टोक्स पायचित गो. नेहरा ३८, जोस बटलर त्रि. गो. बुमराह १५, मोईन अली नाबाद १, जॉर्डन नाबाद ००, अवांतर ८, एकूण : २० षटकांत ६ बाद १३९ धावा. गोलंदाजी : यजुवेंद्र चहल ४-०-३३-०, आशिष नेहरा ४-०-२८-३, जसप्रीत बुमराह ४-०-२०-२, अमित मिश्रा ४-०-२५-१, सुरेश रैना ४-०-३०-०.

Web Title: Account reckoning, chaos persisted!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.