क्रीडा महोत्सवात अकोला, अचलपूरच्या विद्यार्थ्यांची बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 09:17 PM2020-01-04T21:17:17+5:302020-01-04T21:18:13+5:30
२२ चमूंचा सहभाग : तंत्रनिकेतनचा क्रीडा महोत्सव
अमरावती : तंत्रनिकेतन स्तरावर आयोजित क्रीडा महोत्सवात १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अकोल्याच्या खेळाडूंनी प्रथम, तर खामगावच्या खेळाडूंनी द्वितीय क्रमांक पटकाविला. उंच उडीमध्ये अचलपूरचा विद्यार्थी अव्वल ठरला.
महाराष्ट्र राज्य तंत्रनिकेतन मंडळ (मुंबई) द्वारे आयोजित एच झोन अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतनच्या पुढाकाराने शुक्रवारी श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर क्रीडा महोत्सव पार पडला.
उद्घाटन प्राचार्य पी.व्ही. देशमुख यांनी केले. गोळाफेक, धावण्याची शर्यत, थाळीफेक, भालाफेक यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एच झोन अंतर्गत औषधनिर्माणशास्त्र व तंत्रनिकेतनच्या एकूण २२ चमूंनी सहभाग नोंदविला. १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अकोलाच्या गीतादेवी खंडेलवाल फार्मसी कॉलेजच्या गणेश जायभायेने प्रथम क्रमांक पटकाविला. खामगाव येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या निशांत चांडकने द्वितीय क्रमांक मिळविला.
उंच उडीमध्ये अचलपूर येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या कुलदीप काळे याने प्रथम, तर अमरावती येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या अनुराग जैसवाल याने द्वितीय क्रमांक पटकावला. लांब उडीमध्ये गणेश अखाडे व पुष्पक सवांग प्रथम-द्वितीय ठरले. स्पर्धा आयोजनामध्ये पी.व्ही ठाकरे, पी.एस. खोने, जी.पी. दातीर, आर.एम घरत, जे.जी. साबळे, एस.एन. उघडे, मोहन ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विजयी स्पर्धकांना ए.बी. सांगोळे, एन.डी . दुधे , एम.एच. चोरे आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.