'या' अभिनेत्याने कॉमनवेल्थ स्पर्धेत केले होते देशाचे प्रतिनिधित्व
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 05:56 PM2018-04-06T17:56:08+5:302018-04-06T17:56:08+5:30
राष्ट्रकुल स्पर्धेबाबतच्या अनेक रंजक गोष्टींची सध्या चर्चा आहे.
मुंबई: ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे सुरू असणाऱ्या Commonwealth Games 2018 (राष्ट्रकुल स्पर्धा) भारतीय खेळाडू चांगलेच यश मिळवत आहेत. यानिमित्ताने राष्ट्रकुल स्पर्धेबाबतच्या अनेक रंजक गोष्टींची सध्या चर्चा आहे. यापैकी हॉलिवूड अभिनेता जेसन स्टेथमचा किस्सा सध्या भलताच गाजत आहे. हॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून कारकीर्दीला सुरूवात करण्यापूर्वी जेसन स्टेथम याने ऑकलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ब्रिटनचे प्रतिनिधित्व केले होते, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. जेसन हा व्यावसायिक जलतरणपटू (डायव्हर) होता. त्याने 1990 सालच्या राष्ट्रकुल स्पर्धेत ब्रिटनचे प्रतिनिधित्त्व केले होते. ब्रिटनच्या राष्ट्रीय संघात असलेल्या जेसनने डायव्हिंगच्या तीन विविध प्रकारांमध्ये भाग घेतला होता. मात्र, यावेळी त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आली नव्हती.
काही वर्षांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीत त्याने याबद्दल माहिती दिली होती तेव्हा अनेकजण अवाक झाले होते. जेसनने सांगितले होते की, मला लहानपणापासून खेळांची प्रचंड आवड होती. मी तेव्हा कुंग फू, किक बॉक्सिंग, कराटे, फुटबॉल आणि डायव्हिंग असे अनेक खेळ खेळायचो, असे जेसनने सांगितले होते. अवघ्या 12 वर्षांचा असताना ब्रिटनच्या राष्ट्रीय जलतरण संघात त्याची निवड झाली होती. मात्र, राष्ट्रकुल स्पर्धेतील निराशादायक कामगिरीनंतर जेसन स्टेथमने आपला मोर्चा अभिनयाकडे वळवला होता.