आदित्य, सुहानी यांना कांस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 02:36 AM2017-07-31T02:36:47+5:302017-07-31T02:36:50+5:30
आदित्य पाटील आणि सुहानी लोहिया या मुंबईकरांनी अभिमानास्पद कामगिरी करताना नुकताच झालेल्या आशियाई शालेय बुध्दिबळ स्पर्धेत आपआपल्या गटात कांस्य पदकाची कमाई केली.
मुंबई : आदित्य पाटील आणि सुहानी लोहिया या मुंबईकरांनी अभिमानास्पद कामगिरी करताना नुकताच झालेल्या आशियाई शालेय बुध्दिबळ स्पर्धेत आपआपल्या गटात कांस्य पदकाची कमाई केली. आदित्य आणि सुहानी दोघेही दक्षिण मुंबई बुद्धिबळ अकादमी (एसएमसीए) येथे सराव करतात.
चीनमध्ये शनिवारी झालेल्या या स्पर्धेत ७ वर्षीय आदित्यने स्पर्धेत लक्षवेधी आगेकूच करताना ७ वर्षांखालील जलद गटात आपली छाप पाडली. १० देशांतील २६ खेळाडूंचा सहभाग लाभलेल्या या स्पर्धेत आठवे मानांकन असलेल्या आदित्यने ७ पैकी ५ गुणांची कमाई करत कांस्य पदक पटकावले. फिलिपाइन्सच्या अल बाशर याने स्पर्धेत दबदाबा राखताना ७ पैकी ७ गुण मिळवताना निर्विवादपणे कब्जा केला.
तसेच, चीनचा चेन झीयुआन आणि आदित्य दोघांनीही प्रत्येकी ५ गुणांची कमाई केली होती. परंतु, सर्वोत्तम सरासरीच्या जोरावर रौप्य पदक पटकावले, तर आदित्यला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
दुसरीकडे, ८ वर्षीय
वूमन कँडिडेट मास्टर (डब्ल्यूसीएम) सुहानीने आपली विजयी
घोडदौड कायम राखताना आपल्या खात्यात आणखी एका पदकाची भर पाडली. याआधी एक
महिन्यापुर्वी नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल बुध्दिबळ स्पर्धेतही कांस्य पटकावून पहिल्यांदा सुहानी लोहानी प्रकाशझोतात आली होती. चीनमध्येही सुहानीने शानदार खेळाचे प्रदर्शन करताना ९ वर्षांखालील गटात कांस्य पदकावर नाव कोरताना आपल्या कामगिरीत सातत्य राखले.