अदयाप बराच मोठा पल्ला गाठायचा आहे : अश्विन
By admin | Published: September 26, 2016 12:04 AM2016-09-26T00:04:17+5:302016-09-26T00:04:17+5:30
विक्रमबाबत चर्चा करणे घाईचे ठरणार असून अद्याप बराच मोठा पल्ला गाठायचा आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने व्यक्त केली.
कानपूर : विक्रमबाबत चर्चा करणे घाईचे ठरणार असून अद्याप बराच मोठा पल्ला गाठायचा आहे, अशी प्रतिक्रिया सर्वांत वेगवान २०० बळींचा पल्ला गाठणारा जगातील दुसरा गोलंदाज ठरलेला भारतीय आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने व्यक्त केली.
ग्रीनपार्कमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात आतापर्यंत ३ बळी घेणाऱ्या अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये २०० बळींचा टप्पा गाठला.
चौथ्या दिवसाच्या खेळानंतर पत्रकार परिषदेत बोलताना अश्विन म्हणाला,‘माझ्या कामगिरीबाबत आताच चर्चा करणे घाईचे ठरेल. मला अद्याप बराच पल्ला गाठायचा आहे. यंदाच्या मोसमात १२ कसोटी सामने खेळायचे आहे. माझ्या मते एकावेळी एका दिवसाच्या खेळावर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे.’
अलीकडेच वयाची तिशी गाठणारा अश्विन म्हणाला,‘एकाग्रता कायम राखली नाही तर कसोटी क्रिकेटमध्ये पिछाडीवर जाण्यास वेळ लागत नाही. जर काही मिळवायचे असेल तर स्वार्थी असायला हवे. कसोटी क्रिकेटची तयारी करताना एकावेळी एकाच दिवसाच्या खेळाबाबत विचार करावा लागतो. आव्हानाला सामोरे जाण्यास आवडते. या लढतीत विलियम्सन व टेलर चांगले खेळत होते. सामन्यातील यश सर्वकाही प्रतिस्पर्धी फलंदाजांचा ताळमेळ, परिस्थिती आणि सामन्याच्या स्थितीवर अवलंबून असते.’