आदित्यचे निर्णायक विजेतेपद
By admin | Published: June 23, 2015 01:51 AM2015-06-23T01:51:23+5:302015-06-23T01:51:23+5:30
घाटकोपरचा इंटरनॅशनल मास्टर (आयएम) आदित्य उदेशी याने आपल्या लौकिकानुसार वर्चस्व राखताना सर्वाधिक ८ गुणांची कमाई करून नुकत्याच
मुंबई : घाटकोपरचा इंटरनॅशनल मास्टर (आयएम) आदित्य उदेशी याने आपल्या लौकिकानुसार वर्चस्व राखताना सर्वाधिक ८ गुणांची कमाई करून नुकत्याच पार पडलेल्या १८व्या वा.गो. वझे स्मृती बुद्धिबळ स्पर्धेचे दिमाखदार विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे आदित्यने बाजी मारताना गतविजेत्या राकेश कुलकर्णीला बकहोल गुणांच्या जोरावर पिछाडीवर टाकले.
डॉ. प्रकाश वझे क्रीडा प्रतिष्ठान आणि मुंबई बुद्धिबळ संघटनेच्या संयुक्त विद्यमाने मुलुंड मराठा मंडळ सभागृहात पार पडलेल्या या स्पर्धेत सुरुवातीपासूनच आदित्यने विजयी धडाका लावताना विजेतेपदाच्या दिशेने कूच केली होती. त्याचवेळी गतविजेत्या राकेशनेदेखील विजयी घोडदौडीसह स्पर्धा चुरशीची केली. दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी ८ गुणांसह स्पर्धेत संयुक्तरीत्या वर्चस्व राखले होते. मात्र निर्णायक अखेरच्या सामन्यात आदित्यने सर्वाधिक ५५.२ बकहोल गुणांच्या आधारे बाजी मारून रोख ६ हजार रुपयांच्या बक्षिसावरही कब्जा केला. राकेशला ५२.५ बकहोल गुणांसह अखेर द्वितीय स्थानासह ३ हजार रुपयांच्या रोख पारितोषिकावर समाधान मानावे लागले. तसेच ठाण्याच्या अमरदीप बारटक्केने ७.५ गुणांच्या आधारे तृतीय स्थान पटकावले.