अडवाणीची ऐतिहासिक कामगिरी
By admin | Published: May 24, 2016 04:34 AM2016-05-24T04:34:31+5:302016-05-24T04:34:31+5:30
भारताचा स्टार स्नूकरपटू पंकज अडवाणीने अबुधाबीमध्ये आशियाई ६- रेड स्नूकर स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. या विजेतेपदासह अडवाणी ६-रेडमध्ये
अबुधाबी : भारताचा स्टार स्नूकरपटू पंकज अडवाणीने अबुधाबीमध्ये आशियाई ६- रेड स्नूकर स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. या विजेतेपदासह अडवाणी ६-रेडमध्ये विश्व व उपखंडातील स्पर्धांमध्ये जेतेपद पटकावणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.
अडवाणीने अंतिम फेरीत अव्वल मानांकित मलेशियाचा किन हो मो याचा ७-५ ने पराभव करून जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. ३० वर्षीय अडवाणीने उपांत्य फेरीत मायदेशातील सहकारी आदित्य मेहताचा ६-१ ने पराभव केला. चुरशीच्या अंतिम लढतीत अडवाणीने चांगली सुरुवात केली आणि पहिल्या फ्रेममध्ये ३९-४ने सरशी साधली. दुसरी फ्रेम त्याने ६-५१ने गमावली, तर तिसऱ्या फ्रेममध्ये ४०-१४ने वर्चस्व गाजवले. चौथी फ्रेम ०-३७ने गमावली. पाचव्या व सहाव्या फ्रेममध्ये अडवणीने चमकदार खेळ करून ४१-७ व ४४-९ने सरशी साधली. सहा फ्रेमनंतर अडवाणीने ४-२ ने आघाडी घेतली होती; पण किनने सातव्या फ्रेममध्ये ३८-२१ने पुनरागमन केले. अडवाणीने आठव्या फ्रेममध्ये ४५-२४ने विजय मिळवून आघाडी वाढविली. अडवाणीने १२व्या फ्रेममध्ये ५३-२४ने विजय मिळवून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अडवाणीचे यंदाच्या मोसमातील हे पहिले विजेतेपद आहे. (वृत्तसंस्था)
अडवाणी या स्पर्धेत सांघिक गटात भारताचे नेतृत्व करणार आहे. भारतीय संघात अडवाणीव्यतिरिक्त आदित्य मेहता, मनन चंद्रा आणि कमल चावला यांचा समावेश आहे.
आशियाई स्नूकर स्पर्धेतील माझे पहिले वैयक्तिक विजेतेपद आहे. या विजेतेपदामुळे आनंद झाला. गेल्या महिन्यात १५-रेड आशियाई स्नूकर स्पर्धेत जेतेपद पटकावण्यात अपयश आले; पण येथे विजेतेपद पटकावताना त्याची भरपाई केली.- पंकज अडवाणी