आयपीएलमध्ये खेळल्याचा फायदा : ख्रिस गेल
By admin | Published: March 18, 2016 03:34 AM2016-03-18T03:34:35+5:302016-03-18T03:34:35+5:30
खेळपट्टीवर टिकून राहणे हे माझे पहिले लक्ष्य होते. खेळपट्टीवर जम बसल्यानंतर नैसर्गिक खेळ करण्यास मदत मिळाली. त्यामुळेच मी खेळण्याचा पुरेपूर आनंद घेत संघाला विजय मिळवून
मुंबई : खेळपट्टीवर टिकून राहणे हे माझे पहिले लक्ष्य होते. खेळपट्टीवर जम बसल्यानंतर नैसर्गिक खेळ करण्यास मदत मिळाली. त्यामुळेच मी खेळण्याचा पुरेपूर आनंद घेत संघाला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरलो, आयपीएलमध्ये खेळल्याचा फायदा झाला, असे वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल याने सांगितले.
इंग्लंडविरुध्द केलेल्या झंझावाती शतकानंतर गेलने आपल्या खेळीविषयी प्रतिक्रीया दिली. या सामन्याविषयी गेल म्हणाला कि, ‘इंग्लंडविरुद्ध आमची तयारी चांगली झाली होती. आम्ही सुरुवातीपासूनच जिंकण्याच्या निर्धाराने उतरलो होतो. मार्लाेन सॅम्युअल्स चांगली फटकेबाजी करीत होता आणि त्याच्या खेळीमुळे आम्हाला आमचा डाव सावरण्याची मदत मिळाली. सुरुवातीला बळी जाणार नाही याची खबरदारी आम्हाला घ्यायची होती.’
‘खेळपट्टीवर टिकून राहिल्याने मोठे फटके खेळण्याचा आत्मविश्वास मिळाला. शेवटपर्यंत टिकताना इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाविरुध्द वेस्ट इंडिजला विजय मिळवून देऊ शकलो याचा आनंद आहे’, असेही गेलने सांगितले.
आयपीएलमध्ये खेळण्याचा फायदा मिळाल्याचे सांगताना गेल म्हणाला की, ‘संघातील अनेक खेळाडू आयपीएलनिमित्ताने येथे खेळले असल्याने त्यांना खेळपट्टी ओळखीची होती. पुढील सामना श्रीलंकेविरुध्द बंगळुरु येथे खेळायचे असून या सामन्यातही आम्ही आमचा फॉर्म कायम राखू.’
गेल इतर संघांसाठी धोकादायक....
ख्रिस गेलने इतर संघांना धोक्याचा इशारा देताना पहिल्याच सामन्यात इंग्लंडविरुध्द तुफानी खेळी केली. गेलच्या या खेळीनंतर भारताचे माजी कर्णधार लिटल मास्टर सुनील गावसकर यांनीही गेलचा सध्याचा फॉर्म इतर संघांसाठी खूप धोकायक असल्याचे सांगून सर्वच संघांना गेल पासून सावध राहण्याचे सूचित केले. ‘गेल असा फलंदाज आहे ज्याच्या खेळीविरुध्द तुम्ही भाकीत करु शकणार नाही. जोपर्यंत गेल खेळपट्टीवर असतो तोपर्यंत विंडिजच्या विजयाच्या आशा जिवंत असतात. लक्ष्य किती आहे याचा गेलवर काहीही फरक पडत नाही.’
गेल क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम स्फोटक फलंदाज असून ‘विश्वाचा बॉस’ गेलला या प्रकारे खेळताना मजेशीर असते. इंग्लंडने आम्हाला मोठे आव्हान दिले होते. मात्र गेलने आपल्या तुफानी फलंदाजानीने हे लक्ष्य सहजतेने पार करुन दिले.
- डॅरेन सैमी, कर्णधार, वेस्ट इंडिज
वेस्ट इंडिजला विजयाचे पूर्ण श्रेय जाते. त्यांच्याकडून सामना खेचण्यात आम्ही अपयशी ठरलो. गेलने खरोखरंच अद्भुत फलंदाजी केली. जेव्हा गेल फॉर्ममध्ये असतो तेव्हा कोणत्याही संघाला त्याला रोखणे कठीण असते.
- इआॅन मॉर्गन,
कर्णधार - इंग्लंड
विंडिजचे खेळाडू आयपीएल खेळतात याचा त्यांना फायदा झाला. आयपीएलमध्ये आमचे जास्त खेळाडू नाहीत, ही चांगली गोष्ट नाही. ही एक चांगली स्पर्धा असून पुढील वर्षी यात आमचे जास्त खेळाडू सहभागी होतील, अशी मला आशा वाटते. - जोस बटलर, इंग्लंड