आगुतने ‘चेन्नई’ जिंकले
By admin | Published: January 9, 2017 01:05 AM2017-01-09T01:05:47+5:302017-01-09T01:05:47+5:30
एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात आक्रमक खेळ करताना स्पेनच्या रॉबर्टो बितिस्ता आगुतने रशियाच्या युवा खेळाडू डेनिल
चेन्नई : एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात आक्रमक खेळ करताना स्पेनच्या रॉबर्टो बितिस्ता आगुतने रशियाच्या युवा खेळाडू डेनिल मेदवेदेव याला ६-३, ६-४ असे नमवून चेन्नई ओपन पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले. आगुतचे हे करिअरमधील पाचवे एकेरी विजेतेपद ठरले. तर, मेदवेदेव आपल्या पहिल्या एटीपी वर्ल्ड टूर विजेतेपदापासून वंचित राहिला.
आगुतने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेताना सामन्यावर आपले वर्चस्व राखले. त्याच्या वेगवान खेळापुढे मेदवेदेवला फारशी संधी मिळाली नाही. त्याचवेळी दबावाखाली झालेल्या चुकांचा फटकाही मेदवेदेवला बसला. मेदवेदेवला अनेकदा आपल्या चुकीच्या सर्विसच्या फटका बसला. तर, आगुतने आपल्या वेगवान व ताकदवर सर्विसच्या जोरावर मेदवेदेवला चांगलेच जेरीस आणले.
एक तास ११ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या अंतिम सामन्यात आगुतने आपल्या सर्विसवर केवल ८ गुण गमावले. त्याचवेळी मेदवेदेवने अनेकदा आगुतला दिर्घ रॅली खेळण्यास भाग पाडले. परंतु, जम बसलेल्या आगुतने अनेक वेळा या रॅली आपल्या नावावर करीत गुणांची कमाई केली.
मेदवेदेवने आश्वासक सुरुवात करताना आपल्या पहिल्या सर्विसवर गेम जिंकला. मात्र, यानंतर त्याने आपली सर्विस गमावली. यानंतर आगुतने आपली सर्विस राखताना ४-१ अशी निर्णायक आघाडी घेत वर्चस्व मिळवले.
यानंतर कोणाचीही सर्विस भेदली गेली नाही आणि आगुतने नवव्या गेममध्ये आपली सर्विस राखताना पहिला सेट जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये मेदवेदेवने झुंजार खेळ केला. परंतु, आगुतचा धडाका रोखण्यात त्याला अपयश आले. त्याचवेळी, सातव्या गेमदरम्यान मेदवेदेवने पायांच्या मांसपेशी ताणल्या गेल्याने वैद्यकिय उपचारासाठी टाइमआउट घेतला. ४-४ अशी बरोबरी असताना मेदवेदेवने आपली सर्विस गमावली. यानंतर आगुतने आपली सर्विस राखताना सामन्यासह जेतेपदावर नाव कोरले. (वृत्तसंस्था)
४आपल्या पहिल्या एटीपी वर्ल्ड टूर जेतेपदाच्या अंतिम फेरीत खेळत असलेल्या मेदवेदेवने स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केली. याजोरावर तो आपल्या जागतिक क्रमवारीत सुधारणा करु शकतो अशी आशा आहे. सध्या मेदवेदेव ९९व्या स्थानी आहे.
४आगुतने दुसऱ्यांदा चेन्नई ओपनची अंतिम फेरी गाठली होती. याआधी २०१३ साली त्याला यांको टिपसरेविचविरुध्द पराभूत झाल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.