Afghanistan Crisis: 'अफगाणिस्तानजवळ स्वस्तातलं पेट्रोल होतं, पण नरेंद्र मोदींसारखा नेता नव्हता'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 09:31 PM2021-08-16T21:31:35+5:302021-08-16T21:33:38+5:30

Afghanistan Crisis: काबुलमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी ट्विटर व फेसबुकवरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. माजी भारतीय महिला कुस्तीपटू आणि सुवर्णपदक विजेता बबिता फोगाटनेही यावर मत नोंदवलं आहे.

Afghanistan Crisis: 'Afghanistan had cheap petrol, but no leader like narendra Modi' | Afghanistan Crisis: 'अफगाणिस्तानजवळ स्वस्तातलं पेट्रोल होतं, पण नरेंद्र मोदींसारखा नेता नव्हता'

Afghanistan Crisis: 'अफगाणिस्तानजवळ स्वस्तातलं पेट्रोल होतं, पण नरेंद्र मोदींसारखा नेता नव्हता'

Next
ठळक मुद्देअफगाणिस्तानजवळ स्वस्तातलं पेट्रोल होतं, स्वस्तातलं डिझेल होतं आणि स्वस्तातला कांदाही होता. पण, नरेंद्र मोदींसारखा नेता नव्हता, अशी प्रतिक्रिया बबिता फोगाटने दिली आहे

काबुल - अफगाणिस्तानची राजधानी काबुल येथील राष्ट्रपती भवनावर रविवारी तालिबान्यांनी कब्जा केला. त्यानंतर संपूर्ण अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळविल्याचं तालिबान्यांकडून जाहीर करण्यात आलं आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी देखील देश सोडून निघून गेले आहेत. काबुलच्या सध्याच्या परिस्थितीबाबत जगभर चर्चा असून भारताचा शेजारील देश असल्याने आता अफगाणिस्तान आणि भारत या उभय देशांमधील संबंधावर चर्चा घडत आहेत. काबुलमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी ट्विटर व फेसबुकवरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. माजी भारतीय महिला कुस्तीपटू आणि सुवर्णपदक विजेता बबिता फोगाटनेही यावर मत नोंदवलं आहे.  

अफगाणिस्तानातील सद्यस्थितीवर जगभरातून चर्चा घडत आहे. सोशल मीडियातूनही या घटनेवर मत व्यक्त केलं जात आहे. येथील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अफगाणिस्तानातील महिला, बालक व नागरिकांबद्दल सहानुभूती व्यक्त होत आहे. विमानाच्या पाठीमागे धावताना, विमानाच्या चाकाजवळ जागा पकडून देश सोडण्याचा प्रयत्न तेथील नागरिक करताना दिसत आहेत. अभिनेत्री कंगना रनौत आणि कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू व बबिता फोगाटनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

अफगाणिस्तानजवळ स्वस्तातलं पेट्रोल होतं, स्वस्तातलं डिझेल होतं आणि स्वस्तातला कांदाही होता. पण, नरेंद्र मोदींसारखा नेता नव्हता, अशी प्रतिक्रिया बबिता फोगाटने दिली आहे. बबिताने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मत व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री कंगना रनौतनेही अशाच पद्धतीने मत मांडलं आहे. 

काय म्हणाली कंगना रनौत

अफगाणिस्तान हा इस्लामिक देश बनण्यापूर्वी एक हिंदू आणि बुद्धिस्ट राष्ट्र होते. पाकिस्तान हे तालिबान्यांना सांभाळते आणि अमेरिका त्यांना हत्यारं देतात हे लक्षात ठेवायला हवं. तालिबान आता आपल्या किती जवळ आला आहे, जर मोदी नसतील तर उद्या ते आपण असू, असेही कंगनाने आपल्या फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, तालिबान सरकारसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास तयार असल्याचं चीननं आज स्पष्ट केलं आहे. त्यामुळे, चीनचा तालिबानी सरकारला पाठिंबा असल्याचे उघड झाले आहे.  

मी अफगाणिस्तानसाठी प्रार्थना करते - कंगना

कंगनाने एका ब्रेकींग न्यूजचा फोटो शेअर केला आहे. आज आपण मुकाटपणे हे पाहत आहोत, उद्या हे आपल्यासोबतही घडू शकते, असे कंगनाने म्हटले आहे. तसेच, भारत सरकार अफगाणिस्तानमधील भारतीयांना देशात परत आणत आहे, त्यावरही कंगनाने प्रतिक्रिया दिली आहे. चांगलं झालं मी सीएएच्या समर्थनार्थ लढाई लढली. मी संपूर्ण जगाला वाचवू इच्छिते, पण त्यासाठी सुरुवात माझ्या घरापासून करायला हवी. मी आपल्या सरकारचे आभार मानते की, त्यांनी सीएए कायदा आणला आणि एक आशावाद दाखवला. सर्वच हिंदू, शीख, जैन, इसाई, बुद्धिस्ट, पारसी आणि शेजारील इस्लामिक देशांतील इतर धर्मीय नागरिकांना राहण्यासाठी जागा मिळेल, असा आशावाद निर्माण केला. मी अफगाणिस्तानसाठी प्रार्थना करते, असे कंगनाने म्हटले आहे. 

तालिबान्यांना पाकिस्तानकडून खतपाणी

एएफपी या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायला आपण तयार आहोत, असे चीनने म्हटले आहे. तर, तालिबानच्या व्यवहारावर सर्वकाही निर्भर राहीन, असे रशियाने म्हटले आहे. दरम्यान, तालिबानचे मुख्यालय पाकिस्तानमध्येच आहे. त्यामुळे, पाकिस्तानकडून तालिबान सरकारला मान्यता दिली जाईल, असेच दिसून येते. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारास पाकिस्तानकडूनच खतपाणी मिळत असल्याचं भारतीय विदेश मंत्रालयाने म्हटले होते. दुसरीकडे तुर्कीतील बहुतांश लोक या बदलाला संधी समजत आहेत.
 

Web Title: Afghanistan Crisis: 'Afghanistan had cheap petrol, but no leader like narendra Modi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.