अफगाणिस्तानने आफ्रिकेला झुंजविले

By admin | Published: March 21, 2016 02:27 AM2016-03-21T02:27:13+5:302016-03-21T02:27:13+5:30

दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना तुफानी फलंदाजी केलेल्या नवख्या अफगाणिस्तानची अफलातून खेळी अपयशी ठरली. अनुभवाची कमतरता व दडपणाखाली झालेल्या चुका

Afghanistan fought South Africa | अफगाणिस्तानने आफ्रिकेला झुंजविले

अफगाणिस्तानने आफ्रिकेला झुंजविले

Next

रोहित नाईक,  मुंबई
दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना तुफानी फलंदाजी केलेल्या नवख्या अफगाणिस्तानची अफलातून खेळी अपयशी ठरली. अनुभवाची कमतरता व दडपणाखाली झालेल्या चुका यामुळे त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० विश्वचषक स्पर्धेत ३७ धावांनी पराभव पत्करावा लागला. आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या आफ्रिकेला या वेळी झुंजावे लागले.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात २१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा डाव १७२ धावांत संपुष्टात आला. सलामीवीर मोहम्मद शाहजादने अफगाणिस्तानला जबरदस्त सुरुवात करून देताना कागिसो रबाडा व काएल एबॉट यांच्यावर तुफानी हल्ला करून चौथ्याच षटकात संघाचे अर्धशतक झळकावले. या धमाकेदार सुरुवातीनंतर आफ्रिकन्स दबावाखाली आले. मात्र, ख्रिस मॉरिसने शाहझादचा त्रिफळा उडवून संघाच्या विजयातील मुख्य अडसर दूर केला. शाहझादने १९ चेंडूत ३ चौकार व ५ षटकारांची आतषबाजी करत ४४ धावांचा तडाखा दिला.
यानंतर नूर अली झदरान (२४ चेंडूत २५ धावा), गुलबदीन नैब (१८ चेंडूत २६) व सामीउल्लाह शेनवारी (१४ चेंडूत २५) यांनी शानदार फटकेबाजीसह संघाच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र, दडपणाखाली विकेट गेल्याने आफ्रिकेने सामन्यावर पूर्ण पकड मिळवली. मॉरिसने अचूक मारा करत २७ धावांत ४ खंदे फलंदाज बाद करून अफगाण संघाचे कंबरडे मोडले. तर काएल एबॉट, इम्रान ताहीर व कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
याआधी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर आफ्रिकेने अपेक्षित आक्रमक फलंदाजीच्या जोरावर ५ बाद २०९ धावा उभारल्या. हाशिम अमला (५) स्वस्तात परतल्यानंतर क्विंटन डीकॉक (४५) व फाफ डू प्लेसिस (४१) यांनी दमदार फटकेबाजीसह आफ्रिकेच्या मजबूत धावसंख्येचा पाया रचला. डीकॉकने ३१ चेंडूंत ६ चौकार व २ षटकरांसह आपली खेळी सजवली. तर प्लेसिसने २७ चेंडूंत ७ चौकार व एक षटकार ठोकला.
यानंतर धडाकेबाज एबी डिव्हीलियर्सने निर्णायक फटकेबाजी करताना संघाला दोनशेचा टप्पा पार करून देण्यात मोलाचे योगदान दिले. त्याने आपल्या खास शैलीत फटकेबाजी करताना अफगाण गोलंदाजीला मजबूत चोप दिला. केवळ २९ चेंडूंचा सामना करताना ४ चौकार व ५ षटकारांसह शानदार ६४ धावांसह वानखेडे स्टेडियम दणाणून सोडले. जेपी ड्युमिनीनेही (नाबाद २९) छोटेखानी आक्रमक खेळीसह एबीला चांगली साथ दिली.

Web Title: Afghanistan fought South Africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.