अफगाणिस्तानची विजयी सुरुवात

By admin | Published: March 9, 2016 05:14 AM2016-03-09T05:14:52+5:302016-03-09T05:14:52+5:30

अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार ठरलेल्या लढतीत अफगाणिस्तानने स्कॉटलंडचा १४ धावांनी पराभव केला आणि विश्वकप टी-२० स्पर्धेत क्वालिफायरमध्ये विजयी सुरुवात केली.

Afghanistan's winning start | अफगाणिस्तानची विजयी सुरुवात

अफगाणिस्तानची विजयी सुरुवात

Next

भास्कर चौधरी,  नागपूर
अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार ठरलेल्या लढतीत अफगाणिस्तानने स्कॉटलंडचा १४ धावांनी पराभव केला आणि विश्वकप टी-२० स्पर्धेत क्वालिफायरमध्ये विजयी सुरुवात केली. या निकालामुळे अफगाणिस्तान संघाने सुपर टेनमध्ये स्थान मिळविण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या अफगाणिस्तान संघाने ५ बाद १७० धावांची आव्हानात्मक मजल मारली आणि प्रत्युत्तरात खेळणाऱ्या स्कॉटलंड संघाचा डाव ५ बाद १५६ धावांत रोखला.
लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलंड संघातर्फे जॉर्ज मुन्से (४१), केली कोएत्झर (४०), मॅच मचान ( ३६) व पीटर मोमसेन (नाबाद १७) यांनी चांगली खेळी केली; पण विजयासाठी त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले. अफगाणिस्तान संघातर्फे राशीद खानने दोन, तर मोहंमद नबी व समीउल्ला शेनवारी यांनी प्रत्येकी एक बळी घेऊन स्कॉटलंडचा डाव रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याआधी, सलामीवीर मोहंमद शहजाद आणि कर्णधार असगर स्टेनिकजई यांनी डाव सावरल्याने अफगाणिस्तानने ५ बाद १७० धावांची मजल मारली. शहजादने ३९ चेंडू टोलवून ५ चौकार आणि ३ षटकारांसह सर्वाधिक ६१ धावा ठोकल्या. अफगाणिस्तानचा कर्णधार असगरने ५० चेंडूंत ५५ धावांचे नाबाद योगदान दिले. त्याने ४८ चेंडूंत अर्धशतक नोंदविले. आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यातील हे सर्वांत कूर्मगती अर्धशतक ठरले. असगरने २ चौकार आणि १ षटकार मारला. सलामीचा नूरअली जादरान याने १२ चेंडूंत १७ धावा केल्या. तो तिसऱ्या षटकात बाद झाल्यानंतर शहजाद आणि असगर यांनी धावसंख्येला आकार देऊन दुसऱ्या गड्यासाठी १०.१ षटकांत ८२ धावांची भागीदारी केली. गुलाबदीन नैब याने १२ आणि अखेरच्या क्षणी आलेला सफिउल्लाहने ५ चेंडूंवर ३ चौकारांसह १४ धावांचे योगदान दिले. स्कॉटलंडकडून अ‍ॅलेस्टर इव्हान्स, मार्क बाट आणि जोस डेव्ही यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.संक्षिप्त धावफलक
अफगाणिस्तान : २० षटकांत ५ बाद १७० धावा ( मो. शाहबाज ६१, असगर स्टेनिकजई नाबाद ५५, नूर अली १७, शफिकुल्लाह नाबाद १४, गुलबदीन नैब १२, वाट, डेव्ही व इव्हान्स प्रत्येकी एक बळी).
स्कॉटलंड : २० षटकांत ५ बाद १५६ (मुन्से ४१,कोएत्झर ४०, मचान २०, मोमसेन नाबाद १७; राशीद खान २-२८, मोहंमद नबी १-२७, समीउल्ला शेनवारी १-२१).

Web Title: Afghanistan's winning start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.