'गोल्डन बॉय' नीरज चोप्राचा सर्वात मोठा सन्मान; भारतीय अॅथलेटिक्स महासंघाचा ऐतिहासिक निर्णय!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 01:11 PM2021-08-10T13:11:01+5:302021-08-10T13:17:00+5:30
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या अखेरच्या स्पर्धेत नीरज चोप्रानं ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकले.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या अखेरच्या स्पर्धेत नीरज चोप्रानं ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकले. भालाफेकीत ८७.५८ मीटर लांब अंतर पार करून नीरजनं ऑलिम्पिकमधील अॅथलेटिक्स स्पर्धेतील देशाचा १२५ वर्षांचा दुष्काळ संपवला. त्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला अन् बक्षीसांचा पाऊसही पडला. भारत सरकारकडूनही सोमवारी त्याचा सत्कार करण्यात आला. पण, याहीपुढे जात भारतीय अॅथलेटिक्स महासंघानं ( AFI) नीरजचा मोठी सन्मान केला आहे. नीरजनं ७ ऑगस्टला ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले आणि यापुढे प्रत्येक वर्षी हा दिवल भालाफेक दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. दरवर्षी ७ ऑगस्टला देशभरात भालाफेक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.
Neeraj Chopra : तुम्हाला माहित्येय का? गोल्डन बॉय नीरज चोप्रासाठी भारत सरकारनं खर्च केले किती कोटी?
दिल्ली विमानतळावर नीरज चोप्रा, रवीकुमार दहिया, बजरंग पुनिया, लवलिना बोरर्गोहेन आणि पुरुष हॉकी संघाचे जोरदार स्वागत झाले. त्यानंतर सर्व खेळाडूंचे दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात अनुराग ठाकूर, किरण रिजिजू आणि इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नरिंदर बत्रा उपस्थित होते. यावेळी प्रत्येक वर्षी ७ ऑगस्ट हा भालाफेक दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला. महासंघाच्या योजना आयोगाचे अध्यक्ष ललित भनोट यांनी ही माहिती दिली.
यावेळी नीरज म्हणाला, "भाला थ्रो केल्यानंतरच मला कल्पना आली होती की मी काहीतरी विशेष केलंय. मला वाटलं मी माझी वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली आहे. कारण माझा थ्रो उत्तम गेला होता. दुसऱ्या दिवशी माझं शरीर खूप दुखत होतं. त्यातूनच मला माझा कामगिरीची जाणीव झाली. शरीर दुखत होतं पण जिंकलेल्या मेडलनं कोणतंच दुखणं जाणवत नाहीय. हे मेडल संपूर्ण देशासाठीचं आहे."
आपल्या ऐतिहासिक कामगिरीनंतर नीरजने सांगितले की, ‘भालाफेक खेळामध्ये तंत्र अत्यंत महत्त्वाचे असते. अनेक दिवसांच्या कामगिरीवर आणि फॉर्मवर सर्वकाही अवलंबून असते. त्यामुळे आता माझे पुढील लक्ष्य ९० मीटर अंतर पार करण्याचे आहे. यंदाच्या वर्षी मी केवळ ऑलिम्पिकवर लक्ष्य केंद्रित केले होते. आता मी सुवर्ण जिंकले असल्याने, आता पुढील स्पर्धांसाठी मी योजना बनवीन. भारतात परतल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी व्हिसा मिळविण्याचा मी प्रयत्न करीन.’