द. आफ्रिका ‘अ’ २६० धावांत गारद

By Admin | Published: August 26, 2015 04:28 AM2015-08-26T04:28:53+5:302015-08-26T04:28:53+5:30

अक्षर पटेलसह फिरकीपटूंनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाचा पहिला डाव २६० धावांत गुंडाळला. दुसऱ्या व अखेरच्या अनधिकृत

The Africa 'A' guards for 260 | द. आफ्रिका ‘अ’ २६० धावांत गारद

द. आफ्रिका ‘अ’ २६० धावांत गारद

googlenewsNext

वायनाड : अक्षर पटेलसह फिरकीपटूंनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाचा पहिला डाव २६० धावांत गुंडाळला. दुसऱ्या व अखेरच्या अनधिकृत कसोटी सामन्यात आज भारतीय फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवीत पाहुण्या दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाला बॅकफूटवर ढकलण्याची कामगिरी चोख बजावली. दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघातर्फे सलामीवीर स्टियान वान जिलने ९६ धावांची खेळी केली. वान जिलने १३ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ९६ धावांची खेळी केली. पण त्यानंतर भारतीय फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवत दक्षिण आफ्रिकेचे मोठी धावसंख्या उभारण्याचे स्वप्न धुळीस मिळवले.
एक वेळ दक्षिण आफ्रिका संघाची १ बाद १८५ अशी दमदार स्थिती होती; पण त्यानंतर फिरकीपटू अक्षर पटेल (९२ धावांत ५ बळी), जयंत यादव (५३ धावांत ३ बळी) आणि लेगस्पिनर कर्ण शर्मा (३६ धावांत २ बळी) यांनी दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाने अखेरच्या ८ विकेट ७५ धावांच्या मोबदल्यात गमावल्या.
दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. वान जिलने रिजा हॅन्ड्रिक्ससोबत (२२) सलामीला ५८ धावांची, तर जिहान क्लोटेसोबत (२६) दुसऱ्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. जिलने त्यानंतर ओम्फिलो रामेलासोबत (३०) तिसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. वान जिलचा अपवाद वगळता दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघातील अन्य फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. अन्य फलंदाज फिरकीपटूंविरुद्ध संघर्ष करीत असल्याचे चित्र होते. पटेलने हेन्ड्रिक्सला बाद करीत भारताला पहिले यश मिळवून दिले. कर्ण शर्माने रामेलाला तर जयंत यादवने वान जिलला बाद केल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाचा डाव गडगडला. दक्षिण आफ्रिकेच्या तळाच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकाव धरता आला नाही. कर्णधार डेन विलासने २४ धावांची खेळी केली; पण त्याला दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ लाभली नाही. दक्षिण आफ्रिकेच्या चार फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. पटेलने दिवसाच्या अखेरच्या षटकात सलग दोन बळी घेत दक्षिण आफ्रिकेचा डाव गुंडाळला. त्याने प्रथमश्रेणी कारकिर्दीत तिसऱ्यांदा पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेतले आहे. उभय संघांदरम्यान पहिली लढत अनिर्णीत संपली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: The Africa 'A' guards for 260

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.