पुन्हा आफ्रिकेचा दबदबा?
By admin | Published: January 18, 2015 12:09 AM2015-01-18T00:09:40+5:302015-01-18T00:09:40+5:30
१२व्या मुंबई मॅरेथॉनच्या ३ लाख ६० हजार अमेरिकन डॉलर बक्षीस रकमेवर पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आफ्रिकन खेळाडू सज्ज झाले आहेत.
मुंबई : १२व्या मुंबई मॅरेथॉनच्या ३ लाख ६० हजार अमेरिकन डॉलर बक्षीस रकमेवर पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आफ्रिकन खेळाडू सज्ज झाले आहेत. रविवारी होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात केनियाचे, तर महिला गटात इथोपियाचे धावपटू अव्वल क्रमांक पटकावण्यासाठी सज्ज झाले आहेत. आत्तापर्यंत या स्पर्धेत केनियन पुरुषांनी काही वेळा वर्चस्व गाजविले आहे, तर इथोपियन महिलांनी कामगिरीत सातत्य राखले आहे. त्यामुळे इथोपियन महिलांकडून पुन्हा याच कामगिरीची अपेक्षा आहे.
केनियाचा एवान्स रुटो व इथोपियाची दिंकनेश मेकाश हे अनुक्रमे पुरुष व महिला गटात जेतेपद कायम राखण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, या वेळी त्यांना कडव्या आव्हानांचा मुकाबला करावा लागेल. गतवर्षी रुटोला एका सेकंदाने विक्रमाने हुलकावणी दिली होती. उगांडाच्या जेम्स किप्रोप याच्या नावावर असलेला २ तास ०९ मिनिटे व ३२ सेकंदांच्या विक्रम त्याला मोडता आला नव्हता. किप्रोपही यंदा जेतेपदाच्या शर्यतीत असल्याने रुटोसमोर कडवे आव्हान आहे. रुटोने दोन वर्षांपूर्वी २ तास ०७ मिनिटे व ४९ सेकंदांची नोंद केली होती आणि त्याला विएना मॅरेथॉनमध्ये तीनवेळा बाजी मारणाऱ्या हेनरी सुगूटकडून कडवी टक्कर मिळण्याची अपेक्षा आहे. हेनरीची कारकिर्दीतील सर्वोत्तम वेळ २ तास ०६ मिनिटे व ५८ सेकंद आहे. यांच्यासह जेतेपदाच्या शर्यतीत २००७चा विश्व चॅम्पियन लुक किबेट, जेकब चेशरी (केनिया), डॅरेह देबेले (इथोपिया) आणि फेलिक्स किप्रोटीच (केनिया) यांच्याही नावाची चर्चा आहे.
महिला गटात मेकाशने गतवर्षी २०१३च्या विजेत्या केनियाई वी किपकेटरला पिछाडीवर टाकले होते, किपकेटर ही कसर भरून काढण्याच्या प्रयत्नात असेल. केनियाची ग्लॅडीस किपसोई हिनेही जेतेपद पटकावण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच इथोपियाची मार्ता मेग्रा आणि रॅडिया अॅडीलो हेही चर्चेत आहेत. गतवर्षी इथोपियाच्या महिलांनी स्पर्धेवर वर्चस्व गाजवले होते आणि त्यांच्याकडून याच कामगिरीची अपेक्षा आहे. २०११मध्ये पहिल्या सातमध्ये आफ्रिकेच्या खेळाडूंचा समावेश होता. (क्रीडा प्रतिनिधी)
लंडन आॅलिम्पियनपटू राम सिंग यादव याच्या कमबॅकमुळे गतविजेत्या करण सिंग याच्यासमोरील आव्हान वाढले आहे. २०१२मध्ये रामसिंगने २ तास १६ मिनिटे व ५९ सेकंदांची नोंद करीत आॅलिम्पिकचे तिकीट पटकावले होते, परंतु आॅलिम्पिकमध्ये त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही.