द. आफ्रिकेचा शेवट गोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2016 02:35 AM2016-03-29T02:35:32+5:302016-03-29T02:35:32+5:30
अॅरोन फांगिसोची शानदार गोलंदाजी आणि त्यानंतर हाशीम आमलाच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने सोमवारी आयसीसी टी-२0 क्रिकेट विश्वकपच्या
नवी दिल्ली : अॅरोन फांगिसोची शानदार गोलंदाजी आणि त्यानंतर हाशीम आमलाच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने सोमवारी आयसीसी टी-२0 क्रिकेट विश्वकपच्या औपचारिक लढतीत श्रीलंकेवर ८ गडी राखून विजय मिळवला.
दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला १९.३ षटकांत १२0 धावांत गारद केले व त्यानंतर विजयी लक्ष्य १७.४ षटकांत फक्त २ फलंदाज गमावून पूर्ण केले. दोन्ही संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून आधीच बाद झाले होते. त्यामुळे ही लढत फक्त औपचारिक होती. आमलाने ५२ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह नाबाद ५६ धावा केल्या. कर्णधार फाफ डू प्लेसिसने ३६ चेंडूंत ३ चौकारांसह ३१ व अॅबी डिव्हिलियर्सने २ टोलेजंग षटकारासह नाबाद २0 धावा केल्या.
त्याआधी प्रथम फलंदाजी करणारा श्रीलंकेचा संघ १९.३ षटकांत १२0 धावांत गारद झाला. त्यांच्याकडून तिलकरत्ने दिलशानने ३६ व दिनेश चांदीमलने २१ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून काएल एबॉट, अॅरोन फांगिसो आणि बेहारदीन यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : १९.३ षटकांत सर्वबाद १२0. (दिलशान ३६, चांदीमल २१. एबॉट २/१४, अॅरोन फांगिसो २/२६, फरहान बेहारदीन २/१५).
द. आफ्रिका : १७.४ षटकांत २ बाद १२२. (आमला नाबाद ५६, फाफ डू प्लेसिस ३१, लकमल १/२८).
श्रीलंका महिला संघाने
द. आफ्रिकेला नमवले
बंगळुरू : चामारी अटापट्टू हिच्या नेतृत्वाखालील श्रीलंका संघाने आयसीसी टी-२0 विश्वकप क्रिकेटच्या औपचारिक लढतीत आज दक्षिण आफ्रिकेवर १0 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणारा श्रीलंकन संघ ७ बाद ११४ धावा करू शकला; परंतु त्यांनी दक्षिण आफ्रिकेला ७ बाद १0४ धावांवर रोखत विजय मिळवला.