आफ्रिकेने हिसकावला सामना!

By admin | Published: October 18, 2015 11:21 PM2015-10-18T23:21:47+5:302015-10-18T23:21:47+5:30

गेल्या सामन्यातील ‘मॅचविनर’ महेंद्रसिंह धोनी (४७) आणि विराट कोहली (७७) हे दोघेही बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांनी सामन्याला कलाटणी दिली

Afridi face up! | आफ्रिकेने हिसकावला सामना!

आफ्रिकेने हिसकावला सामना!

Next

राजकोट : गेल्या सामन्यातील ‘मॅचविनर’ महेंद्रसिंह धोनी (४७) आणि विराट कोहली (७७) हे दोघेही बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांनी सामन्याला कलाटणी दिली. पाहता पाहता आफ्रिकेने भारताचा तोंडचा विजय हिसकावून नेला. आफ्रिकेच्या मोर्नी मॉर्केलने सर्वाधिक ४ बळी घेतले. या विजयानंतर आफ्रिकेने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ ने मुसंडी मारली. आफ्रिकेच्या ७ बाद २७० धावसंख्येचा पाठलाग करताना टीम इंडिया ६ बाद २५२ धावसंख्येपर्यंत मजल मारू शकली.
रोहित शर्मा (६५), विराट कोहली (७७) आणि महेंद्रसिंह धोनी (४७) यांच्या शानदार खेळीनंतरही भारतीय संघाला विजयी लक्ष्य गाठता आले नाही. मॉर्केलने मोक्याच्या क्षणी फलंदाजांना बाद करीत भारताला जबर धक्के दिले अणि सामन्याचे चित्र पालटविले. त्याने ३५ धावांत ४ बळी घेतले. रोहित-धवन या जोडीने भारताला सन्मानजनक सुरुवात करून दिली होती. पहिल्या गड्यासाठी त्यांनी ४१ धावांची भागीदारी केली. ही जोडी मॉर्केलनेच फोडली. धवन १३ धावांवर बाद झाला. त्यानंतर कोहलीने रोहितला चांगली साथ दिली. रोहितने षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र ड्युमिनीच्या चेंडूवर रोहित त्याच्याकडेच झेल देऊन बाद झाला. रोहितने ७४ चेंडूंत ७ चौकार आणि दोन षटकार ठोकले. रोेहित बाद झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांनी डाव पुढे नेला. मात्र या जोडीला आवश्यक धावगती राखण्यात यश आले नाही. आफ्रिकन गोलंदाजांनी मात्र त्यांच्यावर वर्चस्व राखले. भारताला दहा षटकांत ८६ धावांची आवश्यकता असताना धोनी बाद झाला. ताहिरच्या चेंडूवर लाँग आॅफवर उभ्या असलेल्या मिलरने त्याच्या झेल टिपला. ४६ व्या षटकातमॉर्केलने कोहली आणि अजिंक्य रहाणे यांना सलग दोन चेंडूंवर बाद करीत भारताच्या विजयी आशेला धक्का दिला. कोहलीने ९९ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ७७ धावा केल्या. हरभजन सिंग (२०) आणि अक्षर पटेल (१५) नाबाद राहिले; मात्र त्यांना विजय गाठून देता आला नाही.
त्याआधी, क्विंटन डी कॉकचे शतक आणि त्याने फाफ डू प्लेसिससोबत केलेल्या ११८ धावांच्या भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ७ बाद २७० धावा केल्या. यष्टिरक्षक फलंदाज डी कॉकने सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये उष्ण वातावरणात ११८ चेंडूंना सामोरे जाताना १०३ धावांची खेळी केली. डी कॉकने शतकी खेळीत ११ चौकार व १ षटकार ठोकला. डी कॉकने कारकिर्दीतील ५० वा सामना खेळताना भारताविरुद्धचे चौथे तर एकूण सातवे शतक झळकावले. त्याने डू प्लेसिससोबत तिसऱ्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी केली. डू प्लेसिसने ६३ चेंडूंमध्ये ६ चौकारांच्या मदतीने ६० धावा केल्या. स्लॉग ओव्हर्सपूर्वी सलग ३ षटकांमध्ये डी कॉकसह ३ फलंदाज बाद झाल्यामुळे द. आफ्रिकेच्या धावगतीला खीळ बसली, पण अखेर बेहारडीनने (नाबाद ३३ धावा, ३६ चेंडू) उपयुक्त योगदान देत आफ्रिका संघाला आव्हानात्मक मजल मारून दिली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना द. आफ्रिका संघाने डेव्हिड मिलरला (३३) डावाची सुरुवात करण्यास पाठविले. त्याने डी कॉकच्या साथीने ७२ धावांची भागीदारी करीत संघाला चांगली सुरुवात करून दिली.(वृत्तसंस्था)
>>>>>धावफलक
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक धावबाद १०३, डेव्हिड मिलर झे. रहाणे गो. हरभजन ३३, हाशिम आमला यष्टिचित धोनी गो. मिश्रा ०५, फाफ डू प्लेसिस झे. भुवनेश्वर गो. मोहित ६०, एबी डीव्हिलियर्स पायचित गो. अक्षर ०४, जेपी ड्युमिनी झे. रैना गो. मोहित १४, फरहान बेहारडीन नाबाद ३३, डेल स्टेन धावबाद १२, कागिसो रबादा नाबाद ००. अवांतर (६). एकूण ५० षटकांत ७ बाद २७०. गोलंदाजी : भुवनेश्वर १०-१-६५-०, मोहित ९-०-६२-२, हरभजन १०-०-४१-१, मिश्रा १०-०-३८-१, पटेल ९-०-५१-१, रैना २-०-१३-०.
भारत : रोहित शर्मा झे. आणि गो ड्युमिनी ६५, शिखर धवन झे. डीव्हिलियर्स गो. मॉर्केल १३, विराट कोहली झे. मिलर गो. मॉर्केल ७७, महेंद्रसिंह धोनी झे. स्टेन गो. मॉर्केल ४७, सुरेश रैना झे. मिलर गो. ताहिर ०, अजिंक्य रहाणे झे. मिलर गो. मॉर्केल ४, अक्षर पटेल नाबाद १५, हरभजन सिंग नाबाद २०, अवांतर (११). एकूण : ५० षटकांत ६ बाद २५२. गोलंदाजी : डेल स्टेन १०-०-६५-०, कसिगो रबाडा १०-०-३९-०, मोर्नी मॉर्केल १०-१-३९-४, जेपी ड्युमिनी ८-०-४६-१, इम्रान ताहिर १०-०-५१-१, फरहान बेहारडीन २-०-९-०.

Web Title: Afridi face up!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.