‘आफ्रिदीच्या खराब नेतृत्वामुळे हरलो’
By Admin | Published: April 1, 2016 03:55 AM2016-04-01T03:55:40+5:302016-04-01T03:55:40+5:30
पाकिस्तान संघाचे कोच वकार युनूस यांनी पाकिस्तान संघाच्या टी-२० विश्वचषकातील खराब कामगिरीचे खापर कर्णधार शाहिद आफ्रिदी याच्या डोक्यावर फोडले आहे. शाहिद फलंदाजी
कराची : पाकिस्तान संघाचे कोच वकार युनूस यांनी पाकिस्तान संघाच्या टी-२० विश्वचषकातील खराब कामगिरीचे खापर कर्णधार शाहिद आफ्रिदी याच्या डोक्यावर फोडले आहे. शाहिद फलंदाजी आणि गोलंदाजीत लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकला नाही, असे वकारने पीसीबीला दिलेल्या सहा पानी अहवालात लिहिले आहे.
आशिया चषक तसेच टी-२० विश्वचषकात शाहिद स्वत:च्या उत्तरदायित्वाबद्दल गंभीर नव्हता असा आरोप करीत वकार म्हणाला, ‘शाहिद हा फलंदाजी- गोलंदाजीसह नेतृत्वाला देखील न्याय देण्यात अपयशी ठरल्याची चर्चा मी अनेकदा केली, पण माझे म्हणणे कुणी लक्षात घेतले नाही. सराव सत्र आणि संघाच्या बैठकांना देखील तो दांडी मारायचा. त्याच्या खराब कामगिरीमुळे आम्हाला सामने गमवावे लागले. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर खेळाडूंमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. कर्णधार म्हणून आफ्रिदीला काय हवे हे देखील न कळण्यासारखे चित्र होते. पाक सुपर लीगदरम्यान खेळाडूंचा कुठालही सराव झाला नाही शिवाय आशिया चषकात संघ थकलेला आणि अनफिट वाटत होता. जो कर्णधार सराव आणि बैठकीत सहभागी होऊ शकत नाही तो संघाचे नेतृत्व कसे काय करू शकेल, असा सवाल वकारने उपस्थित केला. वकार पहिल्यांदा २०११ मध्ये संघाचा कोच बनल्यापासून आफ्रिदीसोबत फाटण्याची ही पहिलीच वेळ आहे. वकार व आफ्रिदीच्या भांडणानंतर आफ्रिदीकडून नेतृत्व काढून घेण्यात आले होते.
वकार युनूस आफ्रिदीवर भडकला
वकार म्हणाला, ‘आफ्रिदीने डावपेच अंमलात आणले नाहीत शिवाय योग्य खेळाडूला योग्य स्थानावर संधी दिली नाही. फलंदाजीचा क्रम आणि फिल्डिंग बदलल्याने मोठे नुकसान झाले. कर्णधार दडपणात असल्याने संघाचे मनोबल ढासळले होते. मी खेळाडूंना कितीही चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी मैदानात कर्णधारच खेळाडूंचे नेतृत्व करीत असल्याने डावपेच अंमलात आणू शकतो.’
वकार यांच्यानुसार मोहम्मद हाफिज याने गुडघ्याच्या दुखापतीची माहिती संघ व्यवस्थापनाला दिली नव्हती. या दुखापतीमुळे त्याला न्यूझीलंड आणि आॅस्ट्रेलियाविरुद्ध बाहेर बसावे लागले. उमर अकमल आणि अहमद शहजाद यांच्या बेशिस्त वर्तनाचा अहवाल देखील वकारने सादर केला. निवड समिती माझे ऐकत नाही. मी सलमान बट्टला खेळविण्याची सूचना केली; पण मुख्य निवडकर्ते हारुण रशिद यांनी मला विश्वासात न घेताच खुर्रम मंजूर याला संघात स्थान दिले. पाक क्रिकेट सुधारायचे झाल्यास साहसी निर्णयाची गरज असल्याचे सांगून वकार म्हणाला, मीडियाच्या दडपणात काम करण्याची गरज नाही.
उमर अकमलसारख्यांवर कारवाई झाल्यास पाकला गौरव मिळवून देतील, असे खेळाडू पुढे येऊ शकतात. कोचला निवड समितीत
सहभागी करून घेण्याची सूचना वकारने केली. (वृत्तसंस्था)