13 वर्षानंतर धोनीला पहिल्यांदाच बसावे लागले बाहेर
By admin | Published: May 30, 2017 10:40 PM2017-05-30T22:40:53+5:302017-05-30T23:38:58+5:30
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा दुसरा सराव सामना बांग्लादेशबरोबर झाला. या सामन्यात धोनीला विश्रांती देण्यात आली.
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 30 : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा दुसरा सराव सामना बांग्लादेशबरोबर झाला. या सामन्यात धोनीला विश्रांती देण्यात आली. गेल्या 13 वर्षांमध्ये राखीव खेळाडूंची जर्सी घालून ड्रेसिंग रूममध्ये बसण्याची धोनीची ही पहिलीच वेळ आहे. बांगलादेशविरुद्धच्या या सराव सामन्यात धोनी डगआऊटमध्ये बसलेला पाहायला मिळाला. 2004 मध्ये बांग्लादेशविरुद्धच्याच सामन्यात धोनी त्याची पहिली वनडे खेळला होता. या सराव सामन्यात धोनी मैदानावरील खेळाडूंसाठी चक्क पाणी घेऊन आला होता. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीही ड्रिंक्समॅन झाला होता.
बांगलादेश विरुद्ध झालेल्या दुसऱ्या सराव सामन्यात 240 धावांनी दणदणीत विजय मिळवत पाकिस्तान संघाला एक प्रकारचा इशाराच दिला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने शिखर धवन (60), दिनेश कार्तिक(94) आणि हार्दिक पांड्या (80*) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने 50 षटकात सात बाद 324 धावांचा डोंगर उभा केला होता. भारताच्या या लक्षाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 24 षटकात अवघ्या 84 धावसंखेवर बाद झाला. भारताकडून उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमारने टिच्चून मारा करताना प्रत्येकी तीन बळी मिळवले. जसप्रित बुमराह, शमी, पांड्या आणि अश्विन यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.